नवी दिल्ली : विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 25 जुलै 2022 रोजी संपत आहे. त्यामुळे येत्या चार-पाच महिन्यांनंतर राष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच उमेदवारांच्या नावावरून भाजप आणि आरएसएसमध्ये विचारमंथन सुरू झाले आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुकांनंतर यासंबंधीची चर्चा आणखी तीव्र होणार आहे.
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी सध्या चर्चेत असलेल्या नावांमध्ये उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा समावेश आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी शेवटच्या क्षणी नवीन नाव पुढे आणून सर्वांना आश्चर्यचकित करू शकतात.