अमेरिकेच्या अन्न व औषध विभागाचा निर्णय, मान्यताप्राप्त असे प्रथमच औषध, आता इतर देशांमध्येही मागणी वाढणार
विषाणूंविरोधातील रेमडेसिव्हीर या औषधाला अमेरिकेच्या अन्न आणि औषध विभागाने कोरोनावरील औषध म्हणून अधिकृतरित्या मान्यता दिली आहे. त्यामुळे अधिकृत मान्यता मिळवलेले ते प्रथमच कोरोनाविरोधी औषध ठरले आहे. त्यामुळे त्याचा उपयोग अमेरिकेत मोठय़ा प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
हे औषध परिणामकारक तर आहेच, शिवाय ते जवळपास पूर्ण सुरक्षित असल्याचे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. ते वय वर्षे 12 व त्यापुढील वयाच्या रूग्णांना दिले जाऊ शकते. मात्र ते घेणाऱया रूग्णाचे वजन किमान 40 किलो असले पाहिजे, अशी अट घालण्यात आली आहे. अमेरिकेने मान्यता दिल्याने या औषधाचा उपयोग आता युरोप व इतरत्रही होण्याची शक्यता आहे.
कोणासाठी उपयुक्त
ज्या रूग्णांना तीव्र कोरोना संसर्गामुळे रूग्णालयात हलवावे लागले आहे, त्यांना या औषधाचा उपयोग होऊ शकतो. हे आणिबाणीच्या परिस्थितीत उपयोगात आणण्याचे औषध आहे. या औषधामुळे कोरोना बरा होण्यासाठीचा वेळ काही प्रमाणात कमी होऊ शकतो. रोग लवकर बरा होऊ शकतो, असे परीक्षणाअंती दिसून आले आहे, असे अन्न आणि औषध विभागाने स्पष्ट केले.
हे औषध कसे घ्यावे
डॉक्टरांच्या सूचनेशिवाय हे औषध घेऊ नये. तसेच या औषधाचे स्वतःहून स्वतःवर प्रयोग अजिबात करू नयेत, असा स्पष्ट इशारा तज्ञांनी दिला आहे. तसेच ते किती प्रमाणात घ्यावे, हे सुद्धा डॉक्टरांनीच सांगितले पाहिजे. चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या वेळी, तसेच चुकीच्या प्रमाणात ते घेतल्यास मोठे दुष्परिणाम प्रकृतीवर संभवू शकतात, त्यामुळे प्रत्येकाने सावधानता बाळगावी असाही इशारा तज्ञांकडून देण्यात आला.
उपचारांच्या उपलब्धतेसाठी
अन्न आणि औषध विभागाचे प्रमुख अधिकारी स्टीफन हान यांनी यासंबंधी वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूने थैमान घातले असून 2 लाखांहून अधिक लोकांचा बळी यामुळे गेला आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात विविध उपचार उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. ती लक्षात घेऊनच या औषधाला मान्यता देण्यात आली आहे.
ऐन निवडणुकीआधी…
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस कोरोनावर रामबाण उपाय घोषित होई&ल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी काही दिवसांपूर्वी घोषित केले होते. आता अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीला दीड आठवडा उरला असताना रेमडेसिव्हीर या औषधाला अधिकृत मान्यता देण्यात आली. याचा राजकीय परिणाम काय होतो ते या निवडणुकीचा परिणम समोर आल्यानंतरच दिसेल अशी प्रतिक्रिया तज्ञांनी व्यक्त केली. अशा प्रकारे हे औषध काही प्रमाणात राजकीय विषय बनले आहे.
नव्या औषधांसाठी प्रयत्न
केवळ रेमीडिसेव्हीर या एकाच औषधावर अवलंबून न राहता आणखी नवी औषधे शोधण्यसाठी अमेरिकेचे सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.