रेल्वे पोलिसांकडून दोघा जणांना अटक, 4 लाखांचे दागिने जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
रात्रीपासून पहाटेपर्यंत रेल्वेत चहा विकण्याच्या बहाण्याने महिलांची व्हॅनिटीबॅग चोरणाऱया जोडगोळीला हुबळी रेल्वे पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमीर्ची यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या जवळून 4 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
योहानकुमार फ्रान्चीस कुंदर्ती (वय 20, रा. मंटूर रोड, हुबळी), प्रेमकुमार उर्फ चिंटू येसू सुर्यपल्ली (वय 25, मुळचा रा. मंटूर रोड, हुबळी, सध्या रा. दांडेली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. रेल्वेच्या पोलीस अधिक्षक पुष्पलता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमीर्ची, पोलीस उपनिरीक्षक सत्याप्पा एम., एफ. जी. पुल्ली, रवी वाल्मिकी, प्रवीण पाटील, रमेश लमाणी, सुभाष दळवाई, रायाप्पा गुंडगी आदींनी या जोडगोळीला अटक केली असून त्यांच्या जवळून 4 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता रेल्वेत दागिने कसे चोरण्यात येत होते? याची माहिती त्यांनी दिली आहे.
रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत योहान व प्रेमकुमार हे रेल्वेत चहा विकतात. आपली व्हॅनिटीबॅग बाजुला ठेवून झोपलेल्या महिला प्रवाशांजवळील बॅग चोरुन रेल्वेतून ते बाहेर फेकले जाते. एखाद्या महिलेचा बॅग फेकल्यानंतर पुढील रेल्वे स्टेशनला उतरुन ते बॅग फेकलेल्या ठिकाणी जातात व त्या बॅगमधील किंमती ऐवज लांबवून बॅग तेथेच टाकून येतात. असे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.