लष्कराच्या प्रशिक्षण मैदानामुळे निसर्ग अबाधित : प्राण्यांबरोबरच पक्ष्यांची संख्याही वाढली
प्रतिनिधी /बेळगाव
मागील चार दिवसांपासून बिबटय़ासदृश प्राणी निदर्शनास आल्याची आवई उठली होती. मात्र, प्रत्यक्षात रविवारी टॅप कॅमेऱयाच्या छबीमध्ये तो बिबटय़ा नसून रानमांजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील रेसकोर्स (गोल्फ) मैदानाचे क्षेत्र मोठे आहे. या ठिकाणी प्राणी, पक्षी व वृक्षांची संख्या अधिक असल्याने हा परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. शिवाय अलीकडे या ठिकाणी प्राण्यांबरोबरच पक्ष्यांची संख्याही वाढली आहे.
दरम्यान, बिबटय़ासदृश प्राण्याच्या शोधासाठी बसविण्यात आलेल्या टॅप कॅमेऱयात रानमांजराची छबी कैद झाली. त्यामुळे या परिसरात रानमांजर असल्याचे स्पष्ट झाले. या ठिकाणी विविध जैवविविधता आढळून येते. या मैदानात हिरवळ आणि दाट झाडी असल्याने ससे, रानमांजर, मोर आदींची संख्या वाढली आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱया नागरिकांना सर्रास यांचे दर्शन होते. मॉर्निंग वॉकला जाणाऱया नागरिकांना रानमांजर दिसले आणि बिबटय़ासदृश प्राण्याची आवई उठली. अखेर ते रानमांजर असल्याचे निष्पन्न झाले.
वाघाटी (रानमांजर) हे घरगुती मांजरापेक्षा आकाराने जरा मोठे असते. त्याच्या अंगावर बिबटय़ा किंवा वाघासारखे ठिपके असतात. रानमांजर हे लहान कुत्री, ससे, विविध प्रकारचे पक्षी यांची शिकार करते. मात्र, मानवाला त्याच्यापासून कोणताही धोका नसतो. या परिसरात वेगवेगळय़ा पशुपक्ष्यांची संख्या भरपूर असल्याने रानमांजराचा वावर असणे नैसर्गिक आहे.
भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
रेसकोर्स मैदानात अनेक भटक्मया कुत्र्यांनी आश्रय घेतला आहे. त्यामुळे येथील ससे व मोर यांना या भटक्मया कुत्र्यांचा धोका निर्माण झाला असून या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मॉर्निंग वॉकर्समधून होत आहे.