केंद्रानंतर आता राज्याच्या गाईडलाईन्सकडे लक्ष,`कोव्हॅक्सिन’वर ठरणार लसीकरणाचे नियोजन,
लसीकरणाचे रेकॉर्ड राहणार, मुल्यांकन होणार, टास्क फोर्सच्या बैठका, `व्हिसी’द्वारे तयारी सुरू
प्रतिनिधी / कोल्हापूर
नववर्षात देण्यात येणाऱ्या कोव्हॅक्सिनसंदर्भात केंद्राच्या गाईडलाईन्स आल्या आहेत. लवकरच राज्याच्या गाईडलाईन्सही येणार आहेत. कोणत्या कंपनीच्या कोव्हॅक्सिन कोणत्या भागात वितरीत होणार आहेत, यावर त्याचे नियोजन ठरणार आहे. लसीकरणाचे रेकॉर्ड राहणार असून मुल्यांकनही होणार आहे. कोरोनावरील प्रतिबंधक लस देणाऱ्यांसह घेणाऱ्यांनाही आचारसंहिता पाळावी लागणारी आहे. लस घेणाऱ्यांना मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग काही काळ अनिवार्य राहणार आहे. कोरोना योद्धांसह सर्वानाच ही आचारसंहिता पाळावी लागणार आहे.
महाराष्ट्रात 1 डिसेंबरपर्यत कोरोनाचे 18 लाख 28 हजार 412 रूग्ण होते. त्यापैकी 16 लाख 91 हजार 412 कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 92.74 टक्के आहे. कोरोनाने 47 हजार 247 जणांचा बळी गेला आहे. राज्याचा फर्टिलिटी रेट 2.61 पर्यत आहे. राज्यात 90 हजार 557 ऍक्टिव्ह रूग्ण आहेत. त्यातील सौम्य लक्षणे असलेले 59 हजार 60 आहेत. गंभीर रूग्ण 9 हजार 957 आहेत. अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱयांची संख्या 4 हजार 645 आहे. व्हेटिंलेटरवरील रूग्ण 1 हजार 46 आहेत. फक्त ऑक्सिजनवर असलेले रूग्ण 3 हजार 599 आहेत. सद्यस्थितीत रूग्णसंख्येत घट झाली आहे.
कोव्हॅक्सिन लसिकरणासाठी 3257 केंद्रे
राज्यात कोव्हॅक्सिन लसिकरणासाठी 3 हजार 257 केंद्रे निश्चित केली आहेत. याशिवाय 12 सोलर युनीट, 4199 डीफ फ्रिझर, 4408 आईस रेफ्रिजरेटर, 18 फ्रीझर असणार आहेत. लसीकरणासाठी 1 मिलिलिटर टÎुबक्युरीन सिरिंग्जचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी 24 किंवा 25 जी अर्थात 1 इंचाची निडल वापरली जाणार आहे. लस वापरण्याचा कालावधी 30 मिनिटांचा आहे. तसेच लस दिल्यानंतर 30 मिनिटे तो निरीक्षणाखाली राहणार आहे.
साईडइफेक्टस आल्यास तज्ञ समितीच्या नियंत्रणाखाली उपचार
लस घेतल्यानंतर काही साईडइफेक्टस आल्यास त्यांच्यावर उपचारासाठी डिस्ट्रीक एईएफआय समिती असणार आहे. या समितीत न्युरोलॉजिस्ट, कार्डिंओलॉजिस्ट, मेडीसीन स्पेशालिस्ट असे तज्ञ आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अशा रूग्णांवर उपचार केले जाणार आहेत. साईड इफेक्टस आलेल्या आणि गंभीर असलेल्या रूग्णांवर 15 दिवसांत सर्वोत्तम उपचार प्रणाली वापरली जाणार आहे. लस देण्यापुर्वी प्रत्येक लसीचा नमुना तपासला जाणार आहे. काही त्रुटी आढळल्यास त्याचे इव्हेन्स्टीगेशन होणार आहे.
लसीकरण व्यवस्थापनासाठी ग्रुप, जिल्ह्यात टास्क फोर्स कार्यरत
देशात लसिकरणासाठी नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन कोव्हॅक्सिन ऍडमिनिस्ट्रेशन (एनईजीव्हीएसी) स्थापन झाला आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली राज्य, जिल्हा स्तर, महापालिका, तालुका स्तरावर कोव्हॅक्सिन टास्क फोर्स समित्या स्थापन झाल्या आहेत. कोरोना लसिकरणासाठी आघाडीवर काम करणाऱ्या आरोग्यसेवक, डॉक्टर अन्य स्टाफला प्राधान्याने ही लस सर्वप्रथम दिली जाणार आहे. त्यानंतर पंटलाईन अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. तसेच 50 ते 60 वयोगटातील व्यक्तींना लस दिली मिळणार आहे. त्यासाठी कोव्हॅक्सिन इटेलिन्टंस नेटवर्क सिस्टीम (को-विन) चा वापर केला जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 1 डिसेंबरला सक्रीय रूग्णसंख्या 268 होती ती 14 डिसेंबरला 129 पर्यत खाली आली आहे. राज्यात सर्वात कमी ऍक्टिव्ह केसमध्ये कोल्हापूर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. कोल्हापूर जिल्हÎात 129 सक्रीय रूग्ण आहेत. पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 49 हजार 298 आहे. त्यापैकी 47 हजार 477 कोरोनामुक्त झाले. कोरोनाने 1 हजार 692 जणांचा बळी गेला आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्तीची टक्केवारी 98 टक्क्यांवर पोहोचली आहे.
कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांना आचारसंहिता असणार आहे. लसीकरणानंतर त्यांना काही दिवस कोरोना प्रतिबंधक नियमावली पाळावी लागणार आहे. कोव्हॅक्सिन देणाऱ्या स्टाफला प्रशिक्षण देण्यात येत आहे. या स्टाफलाही आचारसंहिता घालून दिली आहे. राज्यात कोणत्या भागात कोणते कोव्हॅक्सिन वापरले जाणार, यावर लस घेणाऱ्यांना काय दक्षता घ्यावी लागेल, याची आचारसंहिता ठरणार आहे. पण लसीकरणानंतरही त्यांना मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हॅण्डवॉशिंग ही त्रिसुत्री पाळावी लागणार आहे.