ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नेपाळने लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे तीन भाग जरी आपल्या नकाशात दाखवले असले तरीही लिपुलेख आणि कालापानी मधील जमिनी भारतीय नागरिकांच्या नावावर आहेत, असे भारतीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.
नेपाळने लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे तीन भाग आपल्या नवीन नकाशात दाखवून प्रस्तावित केलेल्या घटनात्मक दुरुस्ती विधेयकाला नेपाळी संसदेने कनिष्ठ सभागृहात मंजुरी दिली आहे. मात्र, उत्तराखंडमधील कालापानी व लिपुलेख हे दोन्ही भाग स्थानिक नोंदीनुसार जेथे आहेत ती जमीन भारतातील दोन खेड्यात राहणाऱ्या लोकांच्या मालकीची आहे.
लिपुलेख, कालापानी व नाभीधांग या भारत-नेपाळ सीमेवरील भागातील जमीन गरबियांग व गुंजी या धारचुला विभागातील खेड्यात राहणाऱ्या लोकांच्या मालकीची आहे. हा भाग पिठोरगड जिल्ह्यात येतो, असे धारचुलाचे उपविभागीय दंडाधिकारी ए. के. शुक्ला यांनी सांगितले.
शुक्ला म्हणाले, कालापानी व नाभीधांग येथील 190 एकर जमीन ही गारबियांग गावच्या लोकांची आहे, तर लिपुलेख खिंडीची जमीन ही गुंजी येथील लोकांच्या सामायिक मालकीची आहे. कैलाश मानसरोवर यात्रा दरवर्षी भारत-चीन सीमेवर लिपुलेख मार्गे जात असते. गारबीयांगच्या ग्रामस्थांनी सांगितले की, त्यांच्या पूर्वजांनी कालापानी येथे 1962 च्या चीन युद्धापूर्वी शेती सुरू केली होती. 1962 पूर्वी तेथे कडधान्ये पिकवली जात होती.