ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवडय़ात 9 टक्क्यांनी तेजी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वाहनांच्या इंधनाच्या विक्रीचा विचार करता डिझेलच्या विक्रीत तेजी परतल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये खरा प्रभाव हा सणासुदीच्या दिवसांत होत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. यामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात डिझेल विक्री ही मागील वर्षातील समान कालावधीच्या तुलनेत 9 टक्क्यांनी वाढून 26.5 लाख टनावर पोहोचली आहे.
ऑक्टोबरची विक्री सप्टेंबरच्या तुलनेत जवळपास 25 टक्क्यांनी अधिक राहिली आहे. देशव्यापी लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर तेल मार्केटिंग कंपन्यांची इंधन विक्री एप्रिलमध्ये जवळपास 60 टक्क्यांनी घटली होती. परंतु अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मात्र काहीसा दिलासा मिळत इंधन विक्रीत सुधारणा होत गेल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. अनलॉक काळात अनेक उद्योग, संस्था यांनी आपले कामकाज तितक्याच जोमाने सुरू केल्याचे पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे सार्वजनिक वाहतुकीसही अनेक राज्यांनी परवानगी दिल्याने ट्रक, बससारख्या मोठय़ा वाहनांची वर्दळ वाढली आहे. परिणामी डिझेलची मागणी वाढल्याचे जाणकार सांगतात.