ऑनलाईन टीम / सातारा :
पुण्यातील लोहगाव विमानतळ धावपट्टीच्या कामासाठी शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून बंद करण्यात आले आहे. ते 29 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहे. 30 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजता विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग पुन्हा सुरू होणार आहे. विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी यासंदर्भात माहिती दिली.
लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम सप्टेंबर 2020 पासून हाती घेण्यात आले. 26 ऑक्टोबर 2020 पासून या कामाचा महत्त्वाचा टप्पा सुरू झाला होता. तेव्हापासूनच लोहगाव विमानतळावरून रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत होणारी प्रवासी उड्डाणे बंद ठेवण्यात आली होती. आता धावपट्टीच्या कामासाठी 29 ऑक्टोबरपर्यंत प्रवाशी विमानसेवा बंद राहणार आहे. 30 ऑक्टोबरला ही सेवा सुरळीत होईल. त्यामुळे प्रवाशांना हवाई प्रवासासाठी मुंबई विमानतळ किंवा खासगी हेलिकॉप्टर सेवेवर अवलंबून राहावे लागणार आहे.