प्रतिनिधी/ कराड
सह्याद्रि हॉस्पिटल कराड येथून शुक्रवारी आणखी बारा कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. पुष्पगुच्छ व टाळ्यांच्या गजरात वैद्यकीय अधिकारी व सह्याद्रिच्या स्टाफने सर्व रुग्णांचे अभिनंदन केले. बारा रुणांपैकी 11 रुग्ण हे वनवासमाची येथील असून एक रुग्ण खोडशी येथील आहे.
या सर्व बारा रुग्णांचे तपासणी अहवाल 2 मे रोजी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हे रुग्ण सह्याद्रि हॉस्पिटल येथे हलविण्यात आले होते. या सर्व रुग्णांची पुनर्तपासणी 13 मे रोजी करण्यात आली होती. त्यांचे वैद्यकीय अहवाल 14 मे रोजी उशिरा प्राप्त झाले. निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. या बारा रुग्णांमध्ये 8 पुरुष तर 4 स्त्रिया आहेत. वनवसमाचीच्या 11 रुग्णांमध्ये एका कुटुंबातील 4 जण, पाच वर्षांची एक मुलगी, बारा वर्षांचा एक मुलगा व 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले तीन रुग्ण यांचा समावेश आहे. खोडशी येथील 30 वर्षांच्या रुग्णाला देखिल डिस्चार्ज देण्यात आला आहे.
उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 31 कोरोना बाधित पेशन्ट हे सह्याद्रि हॉस्पिटल मध्ये स्थलांतरित केले होते. त्यापैकी एकुण 18 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यापैकी आज बारा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर जी काटकर, सह्याद्रि हॉस्पिटलचे संचालक मा. दिलीपभाऊ चव्हाण, सह्याद्रि हॉस्पिटलचे कामकाज अधिकारी डॉ. वेंकटेश मुळे व साहाय्यक व्यवस्थापक विश्वजीत डुबल आदी उपस्थित होते.
सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड येथील एक संपूर्ण इमारत कोविड -19 रुग्णांसाठी समर्पित करण्यात आली असून येथे 50 बेडची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. सह्याद्रि हॉस्पिटलने कोरोना वॉरियर्स ची टिम तयार केली असून त्यामध्ये अनुभवी डॉक्टर्स व कुशल नर्सिंग स्टाफ यांचा समावेश असून हे कोरोना वॉरियर्स कोविड-19 बिल्डिंगमध्ये रुग्णसेवेत कार्यरत आहेत.