कुडाळ शहरात अजूनही काहींची बेपर्वाई : पालकांनी मुलांना घरीच थांबवावे
प्रतिनिधी / कुडाळ:
कुडाळ शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. अनेक ज्येष्ठ व्यापारी, नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवरांना संसर्ग झाला. एवढेच नव्हे, तर तो झपाटय़ाने वाढू लागल्याने कुडाळ बाजारपेठ व शहरातील सर्व आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, शहरात गटागटाने दिवसा-रात्री मास्क तोंड व नाकावर लावल्याशिवाय एकत्रित बसणाऱया तरुणाईला त्यांच्या पालकांनी वेळीच आवरण्याची गरज आहे. काही राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधीही या तरुणांच्या गराडय़ात दिसतात, हे अधिक धोकादायक आहे. पालकांनी आपल्या मुलांना घरीच थांबवावे. अन्यथा कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात अधिक वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांत बाजारपेठ, आस्थापने बंद असूनही नाक्यावर, रिकामी जागी तरुणांचे एकत्रित बसणे दिसून येत आहे. काही जागरुक नागरिकांनी याबाबत मोबाईलवरुन कल्पना दिली. ही स्थिती कोरोना वाढीस कारणीभूत ठरण्याची भीतीही व्यक्त केली. शुक्रवारी रात्री मुख्य रस्त्यावरही युवकांची मास्कशिवाय गर्दी दिसून येत होती.
मास्क हनुवटीला
काहीजण मास्क हनुवटीला लटकवून एकत्र गप्पा करणे, खेळणे असे प्रकार करताना दिसून येत आहेत. कुडाळ शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा रोज वाढत आहे. काहींनी तर घरच्या घरी उपचार सुरू केले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागही अनभिज्ञ आहे. पुढचे चार दिवस तरी सर्वांनी घरातच थांबावे, तरच कोरोना संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल.
नागरिकांनी घरातच थांबावे, असे आवाहन शहरातील विविध संस्थांनी करून गंभीर धोक्याचा इशाराही दिला आहे.