मार्चमधील हप्ता भरण्याची ग्राहकांना संधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इन्शुरन्स रेग्युलेटरी ऍण्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडिया(इरडा) यांनी जीवनविम्याच्या पॉलिसी रिन्यूअल करण्यासाठी विमाधारकांना अतिरिक्त कालावधी दिला आहे. यामुळे विमाधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. इरडाकडून मार्च महिन्यातील हप्ता येत्या 31 मे पर्यंत जमा करण्याची सवलत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कोरोना विषाणूमुळे लोकांना विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. जगासोबत देशातील कोविड 19चा संसर्ग मोठय़ा प्रमाणात सुरु असल्याने यातून काही निवडक क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. इरडाने ही बाब लक्षात घेत आपल्या ग्राहकांना विमा हप्ते भरण्यासाठी सवलत देण्याचा निर्णय घोषित केला आहे. मार्च 2020 मधील विम्यांचे हप्ते येत्या 31 मे 2020 पर्यंत भरता येणार असून यासाठी हा अतिरिक्त कालावधी इरडाने दिला आहे.
सर्व विमाधारकांना लॉकडाऊनच्या कालावधीत कार्यालये बंद होती, त्यामुळे विमा हप्ता भरता आला नव्हता.
वार्षिक स्तरावर भरा रक्कम
31 मार्च 2021 पर्यंत विमा हप्त्यांची रक्कम ही प्रत्येक महिना, तीन महिने, सहा महिने या कालावधीच्या प्रमाणानुसार जमा करण्याची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. ही सवलत वार्षिक स्तरावर राहणार असल्याचे इरडाने स्पष्ट केले आहे.