जांभवडे-भूतवड येथील घटना : एकाकडून चित्रीकरण : प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने डुकराला दिले टाकून : व्हिडिओच्या माध्यमातून संशयितांना अटक : एक दिवस वनकोठडी
वार्ताहर / कुडाळ:
विहिरीत पडलेल्या मादी जातीच्या तीन वर्षांच्या डुकराची विजेचा शॉक देऊन शिकार केल्याची घटना कुडाळ तालुक्यातील जांभवडे-भूतवड येथे चार दिवसांपूर्वी घडली. या घटनेचे चित्रीकरण एकाने केल्याने प्रकरण आपल्या अंगलट येईल, म्हणून संशयितांनी त्या डुकराला काही अंतरावर नेऊन टाकले. मात्र, वनविभाग कडावल मंडळाला साक्षीदाराने दिलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून संशयितांना जेरबंद करण्यात यश आले. यातील तीन संशयितांना शनिवारी सायंकाळी अटक करण्यात आली, तर उर्वरित तीन संशयित रविवारी स्वत:हून येथील न्यायालयात हजर झाले. या सहा संशयितांना न्यायालयाने एक दिवस वनकोठडी दिली.
डायगो झुजे डिसोजा (55), अशोक बाबुराव कदम (64), प्रशांत प्रभाकर कदम (27), डॉन उर्फ झुजे डायगो, रॉनी डायगो डिसोजा व नोवेल इलियस बुथेलो (सर्व रा. जांभवडे-भूतवड) अशी संशयितांची नावे आहेत.
वनविभाग कडावल मंडळ कार्यालयाला जांभवडे-भूतवडे येथील एका विहिरीत पडलेल्या डुकराची शिकार करण्यात आल्याची माहिती मिळाली. तेव्हा कडावल वनक्षेत्रपाल अमोल चिरमे आपल्या सहकाऱयांसह घटनास्थळी
वनविभागाच्या जागेत केले दहन
तेथील एका साक्षीदाराकडे या घटनेचा व्हीडिओ मिळाला. त्यानुसार तेथील वस्तुस्थिती पाहून त्या मागावर वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी गेले असता, काही अंतरावर डुकर मृतावस्थेत आढळला. पंचनामा करून त्या डुकराचे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात विच्छेदन करण्यात आले. तसेच नंतर त्याला येथील वनविभागाच्या जागेत दहन करण्यात आले.
विहिरीत हूक टाकून दिला विजेचा शॉक
साक्षीदाराकडून प्राप्त झालेल्या व्हिडिओ चित्रीकरणात घटना स्पष्ट झाली. विहिरीत पडलेल्या त्या जीवंत मादी जातीच्या डुकराला तेथील हूक टाकून विजेचा शॉक देऊन ठार मारण्यात आले. नंतर संशयित त्याला विहिरीतून बाहेर काढून घेऊन गेले.
चित्रीकरणामुळे संशयितांची ओळख स्पष्ट
साक्षीदाराने संशयितांची नावे वनविभागाला दिली. परंतु चित्रीकरणामुळे संशयितांची ओळख स्पष्ट झाली. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात वनविभागाला यश आले. काल सायंकाळी डायगो झुजे डिसोजा, अशोक बाबुराव कदम व प्रशांत प्रभाकर कदम या तिघांना अटक करण्यात आली.
उर्वरित संशयित न्यायालयात हजर
वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी संशयितांचा शोध घेत असल्याचे समजताच संशयितांपैकी डॉन उर्फ झुजे डायगो डिसोजा, रॉनी डायगो डिसोजा व नोवेल इलियस बुथेलो यांनी पळ काढला. आज अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा उर्वरित तिन्ही संशयित स्वत:हून येथील न्यायालयात हजर झाले.
या घटनेत अन्य साथीदार आहेत का?, याचा तपास करण्यासाठी वनकोठडीची मागणी वनविभागाने केली. त्यावर न्यायालयाने एक दिवसाची वनकोठडी दिली.
उपवनसंरक्षक (सावंतवाडी) समाधान चव्हाण व सहाय्यक वनसंरक्षक इ. दा. जालगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडावल वनक्षेत्रपाल अमोल चिरमे व कुडाळचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांच्यासह जांभवडे वनपाल अनिल चव्हाण, जांभवडे वनरक्षक सुभाष वसावे, कुपवडे वनरक्षक दिनेश मेश्राम व सोनवडे वनरक्षक राहुल जोगदंड यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल
डुकर विहिरीत पडल्यानंतर पाण्यातून बाहेर येण्यासाठी धडपड करीत होता. तेव्हा संशयितांनी विजेचा शॉक देऊन त्याला ठार मारण्याच्या हालचाली सुरू केल्या. नंतर मृतावस्थेतील त्या डुकराला त्यांनी बाहेर काढले. नंतर काही अंतरापर्यंत घेऊन जात आहेत, हे त्या व्हिडिओत दिसत आहे. तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
ग्रामस्थामध्ये बाचाबाची
विहिरीत पडलेल्या त्या डुकराला शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यावेळी संशयित व तेथील एक ग्रामस्थ यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करीत असल्याची कल्पना संशयितांना होती. तरीही त्यांनी हे कृत्य केले. मात्र, हे प्रकरण आपल्या अंगलट येणार, या भीतीने त्या संशयितांनी मृतावस्थेतील डुकराला काही अंतरावर नेऊन टाकले, अशी चर्चा आहे. त्या ग्रामस्थाचा या कृत्याला विरोध होता. त्यामुळेच ही घटना उघडकीस आली, असे समजते.