प्रतिनिधी/ मडगाव
वेर्णा औद्योगिक वसाहतीत काल सोमवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या दरम्यान एक जीवंत वीज वाहिनी तुटून दुचाकी चालकावर पडल्याने दुचाकी चालक जखमी झाला असून त्याला मडगावच्या खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. जीवंत वीज वाहिनीशी संपर्क आल्याने दुचाकीने पेट घेतला. त्यात अर्धीअधिक दुचाकी जळून खाक झाली. नंतर ही आग अग्निशामक दलाने विजवली.
उपलब्ध माहितीप्रमाणे महेश दोड्डामणी (34) हा आपल्या हिरो होंडा मोटारसायकलवरून दुपारी जेवणासाठी जात असताना, वेर्णा औद्योगिक वसाहतीतील फिनोलेक्स कंपनीजवळ अचानक जीवंत वीज वाहिनी तुटून त्याच्या अंगावर पडली. वीज वाहिनीच्या संपर्कात येताच तो दूरवर फेकला गेला. जीवंत वीज वाहिनी मानेवर पडल्याने त्याच्या ‘गळपट्टीचे हाड’ प्रेक्चर झाले. तसेच त्याला बराच मार लागला आहे.
दैव बलवत्तर म्हणून बचावला
महेश दोड्डामणी हा बिर्ला-जुवारी नगर येथील असून तो वेर्णात एक कंपनीत काम करतो. काल दुपारी जेवणासाठी तो आपल्या दुचाकीवरून जात असताना, अचानक त्याच्या अंगावर वीज वाहिनी तुटून पडली. वीज वाहिनीच्या संपर्कात येताच तो दूरवर फेकला गेल्यानेच बचावला. जर दूरवर फेकला गेला नसता तर भयानक परिस्थिती उद्भवली असती.
जबर जखमी झालेल्या महेशला कोरोनामुळे गोमेकॉत न नेता, मडगावच्या खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या गळपट्टीचे हाड मोडल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्याला गळय़ाशेजारी जखम झाली असून ती जखम ठिक झाल्यानंतरच शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
वीज खात्याचा निष्काळजीपणा
जीवंत वीज वाहिनी तुटून पडणे हा वीज खात्याचा निष्काळजीपणा असल्याच्या प्रतिक्रिया काल व्यक्त झाल्या. सुदैवाने दुपारची वेळ व रहदारी कमी असल्याने काल मोठी दुर्घटना टळली. ही वीज वाहिनी नेमकी कशी तुटली हे उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. वेर्णा औद्योगिक वसाहतीत सकाळ व संध्याकाळच्या वेळी जास्त वर्दळ असते. अशावेळी ही वीजवाहिनी पडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती अशा प्रतिक्रीया अनेकांनी व्यक्त केल्या.
वीज खात्याच्या कर्मचारी व अभियंत्यांनी अधिक कार्यतत्पर असणे महत्वाचे बनल्याचे कालच्या दुर्घटनेवरून स्पष्ट झाले आहे.