ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कृषी सुधारणा कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद अमेरिकेतही उमटत आहेत. भारतीय शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ खलिस्तानी आंदोलकांकडून वॉशिंग्टनमध्ये भारतीय दूतावासासमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली.
भारतीय दूतावासाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतातील शेतकऱ्यांच्या समर्थनात वॉशिंग्टनमधील खलिस्तानी आंदोलकांनी भारतीय दूतावासासमोरील महात्मा गांधी मेमोरियल प्लाझासमोर असलेल्या गांधीजींच्या पुतळ्यावर खलिस्तानी झेंडा टाकून चेहरा झाकला. शांती व न्यायाचे प्रतिक म्हणून बघितल्या जाणाऱ्या महात्म्याच्या विटंबनेचा भारतीय दूतावासाने निषेध व्यक्त केला आहे.
अमेरिकेतील कायदा एजन्सीकडेही या प्रकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच भारतीय दूतावासाने मेट्रोपॉलिटिन आणि नॅशनल पार्क पोलिसांकडे याची तक्रार नोंदवली आहे. राज्याचे उपसचिव स्टिफन बिगन यांनी या घटनेप्रकरणी माफी मागितली आहे.