भारतावर पडणार थेट प्रभाव : चीनने व्याजदर घटविले : जागतिक आर्थिक संकट दूर होणार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान असलेल्या अमेरिका आणि चीनने व्यापारयुद्ध संपुष्टात आणण्यासाठी पहिल्या टप्प्यातील करारावर स्वाक्षरी करण्याचा दिवस निश्चित केला आहे. दोन्ही देश 15 जानेवारी रोजी करारावर स्वाक्षरी करणार आहेत. तर चीनने स्वतःच्या अर्थव्यवस्थेत प्राण फुंकण्यासाठी व्याजदर घटविण्याची घोषणा केली आहे.
चीनची मध्यवर्ती बँक पीपल्स बँक ऑफ चायनाने व्याजदरात 0.50 टक्क्यांची घट केली आहे. नवे दर 6 जानेवारी 2020 पासू लागू होणार आहेत. वर्षाच्या पहिल्याच दिवशी उचलण्यात आलेली ही दोन्ही पावले भारतासह जगभरातील अर्थव्यवस्थांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. चीनमधील व्याजदर घटल्याने तेथे कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांना थेट लाभ होणार आहे. विशेषकरून टाटा मोटर्सच्या एकूण विक्रीचा 10 टक्के हिस्सा चीनमधून येतो.
नजीकच्या भविष्यात काय घडणार?
व्यापारयुद्ध शमल्याने भारतासह अनेक देशांची मोठी चिंता दूर होणार आहे. अशा स्थितीत भारतही स्वतःची सामग्री सहजपणे अन्य देशांना निर्यात करू शकणार आहे. यातून निर्यातीत भर पडून अर्थव्यवस्थेला दिलासा मिळणार आहे. पण या व्यापार युद्धादरम्यान भारत आणि चीन यांच्यातील व्यापार अत्यंत वेगाने वाढल्याचे दिसून आले आहे.
भारतावरील प्रभाव
पीपल्स बँक ऑफ चायनाच्या निर्णयाचा थेट प्रभाव भारताच्या धातू आणि खाणउद्योगावर पडणार आहे. लोह आणि खाणउद्योगात सामील कंपन्यांच्या समभागांमध्ये वधार येण्याची अपेक्षा आहे. याचबरोबर टाटा मोटर्सचे समभाग तेजीत येण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे मानणे आहे.
नववर्षात दोन मोठे निर्णय
1 अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध संपविण्यासाठी पहिल्या टप्प्यातील करारावर 15 जानेवारी रोजी स्वाक्षरी होणार.
2 चीनमधील व्याजदरात कपात, या निर्णयामुळे भांडवली बाजारामध्ये 8.16 लाख कोटी रुपयांची तरलता वाढणार आहे.
मोठय़ा कंपन्यांना मिळणार दिलासा
दोन्ही देशांदरम्यान पुन्हा चर्चा सुरू झाल्याने गुंतवणूकदार आणि अनेक दिग्गज कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. दोन मोठय़ा अर्थव्यवस्थांमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धाच्या स्थितीत हा मोठा दिलासा ठरणार आहे.
? आयफोन निर्माता ऍपल कंपनीने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारयुद्धाच्या धोरणाला अनेकदा विरोध दर्शविला आहे. मागील एक वर्षात ऍपलच्या विक्रीत मोठी घट झाली आहे.
? तर दुसरीकडे अमेरिकेने चीनमधील हुवावे या स्मार्टफोन निर्माता कंपनीवर बंदी घातली आहे. चीनच्या या कंपनीवर अमेरिकेने हेरगिरीचा गंभीर आरोप केला आहे.
? अमेरिकेने चिनी उत्पादनांवरील आयातशुल्क 10 टक्क्यांवरून वाढवत 25 टक्के केले आहे. याच्या प्रत्युत्तरादाखल चीननेही अमेरिकेच्या उत्पादनांवर आयातशुल्क लादले.
? व्यापारयुद्धामुळे अमेरिका आणि चीनला चालू आर्थिक वर्षातील जीडीपीत 0.25 टक्क्यांचे नुकसान सहन करावे लागू शकते, असे डीबीएस ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे.