पक्षकारांनी वेळेत उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
पक्षकारांना विनाखर्च आणि तातडीने न्याय मिळावा, यासाठी राष्ट्रीय लोकअदालत भरविली जाते. शनिवार दि. 12 रोजी ही लोकअदालत असून पक्षकारांनी या लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश सी. एम. जोशी यांनी यापूर्वीच जनतेला आवाहन केले आहे. संपूर्ण जिल्हय़ामध्ये लोकअदालत भरवून प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी भर दिला जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
लोकअदालतमध्ये कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, याबद्दल कोणीही संशय बाळगू नये. कायद्याच्या चौकटीतच न्याय दिला जातो. वादी-प्रतिवादी हे दोघेही राजी झाल्यानंतरच खटल्याचा निकाल दिला जातो. तेव्हा लोकअदालतमध्ये खटला दाखल केल्यानंतर आपल्यावर अन्याय होईल, हा संशय पक्षकारांनी बाळगू नये, असे सांगण्यात आले. तेव्हा लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.
संपूर्ण जिल्हय़ामधील न्यायालयांमध्ये ही लोकअदालत घेतली जाणार आहे. तालुक्मयाच्या न्यायालयांमध्ये तर बेळगावमधील लोकअदालतीच्या इमारतीमध्ये ही लोकअदालत होणार आहे. यावेळी बहुसंख्य न्यायाधीश उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत खटले निकालात काढले जाणार आहेत. कोरोनामुळे मध्यंतरी अनेक खटले प्रलंबित आहेत. लोकअदालत भरविणेही अडचणीचे झाले होते. मात्र, आता ही लोकअदालत निश्चितच यशस्वी होईल, असे त्यांनी सांगितले. या लोकअदालतीमध्ये बँक कर्ज प्रकरणे, धनादेश न वठणे, दिवाणी खटले, कौटुंबिक खटले, विम्यासंदर्भातील नुकसानभरपाईचे खटले निकालात काढले जाणार आहेत. विशेषकरून दिवाणी खटले निकालात काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.