पिंपळगाव / प्रतिनिधी
पिंपळगाव (ता.भुदरगड ) येथे कारगिल युद्धातील शहीद जवान शिवाजी मगदूम यांचा १९ वा स्मृतीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहीद शिवाजी मगदूम यांच्या १९ व्या स्मृतीदिनानिमित्त गरीब व निराधार मुलांना मदतनिधी वाटप व शिवकालीन मावळ्यांच्या वंशजांचा सन्मान अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचे ‘ थोडंस जगणं समाजासाठी ‘ आयोजन शहीद शिवाजी मगदूम सोशल फौंडेशनच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी प्रा.यशवंत गोसावी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कराड येथील लिगाडे-पाटील कॉलेजचे अध्यक्ष बाजीराव पाटील हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रतिमापूजन करण्यात आले. सुरुवातीला प्रास्ताविक अध्यक्ष सागर मिसाळ यांनी केले. यावेळी शहीद शिवाजी मगदूम ‘समाजरत्न’ पुरस्काराने करवीरचे शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार यांना गौरविण्यात आले. तसेच शिवकालीन सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजीराव बाजी मोहिते ,गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांचे वंशज दादाराम नाईक ,सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज जयराज गुजर यांचा सन्मान करण्यात आला.तसेच गरीब व निराधार मुलांना मदतनिधीचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रा.यशवंत गोसावी म्हणाले ,कितीतरी महान व्यक्तीनी ज्या कमी वयात आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केले,त्याच वयात आजचा तरुण भरकटत चालला आहे. म्हणूनच तरुणांनी चांगल्या दर्जाची स्वप्ने स्वप्ने पाहावीत .आज स्वराज्य आले असले तरी सुराज्य घडविण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.छत्रपती शिवरायांच्या व्यापक विचारांचा वारसा प्रत्येक शिवप्रेमीच्या कृतीतून व्यक्त झाला पाहिजे , असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी समाजरत्न पुरस्कार प्राप्त विश्वास सुतार ,जयाजीराजे मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास माजी जि. प.सदस्य प्रा.अर्जुन आबिटकर ,संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मानसिंग देसाई , भुदरगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष दयानंद भोईटे ,डी. के.परीट ,तानाजी मगदूम ,श्रीधर भोईटे ,वासुदेव मगदूम ,संदिप पाटील ,संदिप चव्हाण ,तानाजी भोसले ,आनंदा भोसले ,विनायक पाटील ,जोतिराम शेवाळे ,मारुती चव्हाण ,ओंकार देसाई ,विक्रम पाटील ,विलास पोवार आदी उपस्थित होते .आभार तानाजी पावले यांनी मानले.