शिराळा / वार्ताहर
शिराळा शहरानजीक असणाऱ्या गोरक्षनाथ मंदिर, कापरी, जांभळेवाडी दरम्यान आज सकाळी ६:३० च्या दरम्यान चार गव्यांचे दर्शन झाल्याने शेतकरी नागरिक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच परिसरात बिबट्याचाही वावर आहे. काही महिन्यांपूर्वी मोटारसायकल वरील नागरिकावर बिबट्याने हल्ला केला होता. बिबट्या व गवा यामुळे नागरिक व शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शिराळा शहरासह तालुक्यात बिबट्या पाठोपाठ आता गव्याचे दिवसा व रात्रीही दर्शन होत आहे. त्यामुळे बाहेर कोरोना अन् शेतात गव्याची भीती अशी अवस्था झाल्याने शेतांच्या कामांनाही गव्यामुळे व्यत्यय येत आहे. लोकांत कोरोनासह गव्याच्याही भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्याना मध्ये अपेक्षित खाद्य मिळत नसलेने बाहेर मानवीवस्तीत प्राण्यांचा वावर वाढला आहे . बिबटे , माकडं वानरे यांचा वावर हा नित्याचाच आहे . त्यात आता गव्यांची भर पडली आहे . शिराळा शहरासह तालुक्यात अनेक गावांत महिन्यातून एक वेळ तरी कोणत्या ना कोणत्या गावात पाळीव प्राण्यावर बिबट्याचा हल्ला झालेला असतो . माकडं व वानरे पिकांचे नुकसान करीत आहेत .
त्यात या प्राण्यांबरोबरच गव्यांची भर पडली आहे काही महिन्यांपूर्वी मणदूर येथील संतू पाटील यांना गव्याने जखमी केले होते. देववाडी , खेड फाटा, शिराळा बस स्थानक, चिखलवाडी , पवारवाडी , शिंगटेवाडी आदी परिसरात दि.२९ व ३० एप्रिल २०२० रोजी रात्री गव्याचे दर्शन झाले होते. हा गवा रेडा डांगे गल्ली , पवळ गल्लीतून गेला व याठिकाणी मक्याच्या पिकाचे नुकसान केले होते. वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रकांत देशमुख,देवकी तसीलदार , हणमंत पाटील, संपत देसाई, बाबा गायकवाड, नामदेव सिद, संभाजी पाटील यांनी या परीसराची पाहणी करत आहेत.