ऑनलाईन टीम / मुंबई :
एका व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिची बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांना मुंबईतील अंधेरी कोर्टाने समन्स बजावले आहे. 21 लाखांच्या कर्जाशी संबंधित हे प्रकरण असून, कोर्टाने या तिघींनाही 28 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
शिल्पाच्या दिवंगत वडिलांनी 2015 मध्ये 18 टक्के व्याजाने 21 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते आणि ते जानेवारी 2017 मध्ये व्याजासह परत करायचे होते. तत्पूर्वीच त्यांचा 2016 मध्ये मृत्यू झाला. त्यांनी या कर्जाबाबत पत्नी सुनंदा आणि मुलींना सांगितले होते. मात्र, त्यानंतर शिल्पा, शमिता आणि त्यांच्या आईने कर्ज फेडण्यास नकार दिला. त्यामुळे संबंधित ऑटोमोबाईल एजन्सीच्या मालकाने शिल्पा शेट्टी, तिची बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांच्या विरोधात M/s Y&A Legal या लॉ फर्ममार्फत 21 लाख रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. व्यावसायिकाच्या तक्रारीची दखल घेत कोर्टाने या तिघींना 28 फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.