ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेनेचे नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आज पहाटे केंद्रीय आयकर विभागाने छापा टाकला. यशवंत जाधव यांनी बेनामी कंपनीच्या नावे 15 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आयकर विभागाकडून पहाटेपासून यासंदर्भात चौकशी सुरू असून, जाधव यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे पथक तैनात करण्यात आले आहे.
यशवंत जाधव हे मागील पाच वर्षांपासून स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी प्रधान डिलर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून 15 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष असल्यापासून टेंडरच्या माध्यमातून हा पैसा फिरवण्यात आला. मुंबई महापालिकेत दरवषी किमान 6 हजार कोटींचे टेंडर पास होतात. 25 वर्षाचा हिशोब लावला तर किमान दीड लाख कोटींचा भ्रष्टाचार स्थायी समितीच्या माध्यमातून शिवसेनेने केला आहे, असाही आरोप भाजपकडून करण्यात आला होता.
त्यानंतर आज पहाटेच केंद्रीय आयकर विभागाने जाधव यांच्या माझगाव येथील घरावर छापा टाकला. त्यांच्या घरात कागदपत्रांची तपासणी केली जात असून, चौकशी सुरू आहे.