सेन्सेक्समध्ये 111 अंकांची वाढ, बँकिंग समभाग तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक मिळत्याजुळत्या कलाचा फायदा उठवत भारतीय शेअर बाजाराने आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी तेजी कायम ठेवली. एचडीएफसी, एसबीआय आणि आयसीआयसीआय बँकांच्या तेजीमुळे बीएसई सेन्सेक्सचा निर्देशांक 111 अंकांच्या वाढीसह तर निफ्टी निर्देशांक 22 अंकांच्या तेजीसह बंद झाला.
सोमवारी सरतेशेवटी सेन्सेक्स निर्देशांक 50,651.90 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 15,197.70 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स सकाळी 300 अंकांनी वरचढ होता तर निफ्टी निर्देशांक 74 अंक वाढीसह एकावेळी 15,250 अंकांवर व्यवहार करत होता. बँक व वित्त कंपन्यांच्या समभागांमध्ये तेजी दिसल्याने याचा भारतीय बाजाराला चांगला आधार मिळाला. एसबीआयचे समभाग 2 टक्के इतके तेजीत होते. धातू कंपन्यांचे समभाग मात्र दबावात होते. एल अँड टी, एचडीएफसी बँक, मारूती, ऍक्सिस बँक आणि डॉ. रेड्डिज यांचे समभाग तेजीसह बंद झाले. दुसरीकडे कोटक बँक, एशियन पेंट, इन्फोसिस, इंडसइंड बँक आणि एचयुएल समभाग मात्र घसरणीत बंद झाले. एकावेळी सेन्सेक्स 300 अंकांच्या वाढीसह निर्देशांक 50,848 अंकांवर व्यवहार करत होता.
कोरोना महामारीच्या काळात रुग्णसंख्या घटल्याचा व लसीकरणावर भर दिला जात असल्याचा सकारात्मक कल बाजारात दिसत होता. गेले दहा दिवस नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱयांचे प्रमाण वाढले आहे.
सकाळी सेन्सेक्स निर्देशांक 186 अंकांच्या वाढीसह तर निफ्टी निर्देशांक 36 अंकांच्या वाढीसह खुला झाला. बाजारात सुरुवातीलाच सॉफ्टवेअर कंपनी बिर्ला सॉफ्टच्या समभागांमध्ये 15 टक्के उसळी दिसून आली. बाजारात चौफेर खरेदीचा जोर दिसला. सेन्सेक्समधील 30 पैकी 28 समभाग तेजीसह तर निफ्टीतील 45 समभाग नफ्यासह बंद झाले. शुक्रवारी शेअर बाजार 970 अंकांच्या वाढीसह निफ्टी 269अंकांच्या वाढीसह बंद झाला होता.