सेन्सेक्समध्ये 760 अंकांची वाढ ः जागतिक सकारात्मक संकेताचा परिणाम
वृत्तसंस्था/ मुंबई
सकारात्मक जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअरबाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक चांगल्या मजबुतीसह सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी तेजी राखून बंद झाल्याचे पाहायला मिळाले. इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रिज यांचे समभाग लाभासह बंद झाले.
सोमवारी सरतेशेवटी शेअर बाजारात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 760 अंकांच्या वाढीसह 54,521 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 229 अंकांच्या वधारासह 16,278.50 अंकांवर बंद झाला. सोमवारी बाजारात मोठय़ा प्रमाणात खरेदीवर जोर दिसून आला. एकावेळी सेन्सेक्स निर्देशांकामध्ये 450 अंकांची तेजी दिसली होती. तर निफ्टी निर्देशांक 16,200 च्या दरम्यान व्यवहार करत होता.
आज बाजारामध्ये चौफेर तेजीचा कल दिसला होता. निफ्टीमध्ये आयटी निर्देशांक 1 टक्का वाढीसह व्यवहार करत होता. बँक, वित्त आणि ऑटो निर्देशांक हेदेखील जवळपास अर्धा टक्का इतक्मया वाढीसह कार्यरत होते. रिऍल्टी, एफएमसीजी, धातू, फार्मासह इतर निर्देशांकदेखील तेजीचा कल दाखवत होते. याच दरम्यान एकावेळी सेन्सेक्स निर्देशांकाने 453 अंकांची तेजी घेत 54,214 अंकांपर्यंत मजल मारली होती. तर निफ्टी 149 अंकांच्या वाढीसह 16,198 अंकांवर होता.
सन फार्मा, टाटा स्टील, विप्रो, इंडस इंड बँक, पॉवर ग्रिड कॉर्प, एचसीएल टेक्नॉलॉजिस, डॉ. रेड्डीज लॅब्ज, ऍक्सिस बँक यांचे समभाग घसरणीत होते. लार्सन अँड टुब्रो, मारुती सुझुकी, टायटन, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी, महिंद्रा आणि महिंद्रा, नेस्ले आणि भारती एअरटेल यांचे समभाग तेजी राखून होते. खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसीचा समभाग बाजारामध्ये घसरणीमध्ये होता. बँकेचा समभाग 1.60 टक्के इतका घसरणीसह 1,342 रुपयांवरती व्यवहार करत होता. तर जागतिक बाजारांचा विचार करता अमेरिकेतील व युरोपातील बाजार तेजीत होते. आशियाई बाजारात निक्की 145 अंकांनी, हँगसेंग 548, कोस्पी 44 व शांघाई कम्पोझीट 50 अंकांनी तेजी राखून होता.