शिक्षण खात्याकडून 15 जूनपासून पूर्वतयारीची शाळांना सूचना
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना संसर्ग कमी होत असल्याने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खात्याने 2021-22 हे शैक्षणिक वर्ष 1 जुलैपासून सुरू करण्याची घोषणा केली आहे. शिवाय नव्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. दरम्यान, सार्वजनिक शिक्षण खात्याने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या पूर्वतयारीची कामे 15 जूनपासून हाती घेण्याची सूचना केली आहे.
मुलांची शालेय प्रवेश प्रक्रिया, प्रवेशासाठी प्रचार, वार्षिक नियोजन, अध्ययनासाठी ऑनलाईन, ऑफलाईन अध्यापन पद्धतीचे नियोजन, विद्यार्थ्यांचे अध्ययन-मूल्यमापन यासंबंधीचा आराखडा व इतर शैक्षणिक तयारी करण्याची सूचना शिक्षण खात्याने आदेशपत्रकाद्वारे दिली आहे.
जर 1 जुलैपासून शाळेतच वर्ग भरणे शक्य झाले तर दरवर्षीप्रमाणे वार्षिक नियोजनानुसार अभ्यासक्रम शिकवावा. कोरोना परिस्थितीमुळे शाळेत वर्ग भरविणे शक्य झाले नाही तर मागील वर्षातील त्रूटी विचारात घेऊन नव्या शैक्षणिक वर्षात पर्यायी रुपरेषा तयार करावी. मुलांची शिक्षण प्रक्रिया निरंतरपणे सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही सूचविण्यात आले आहे.
मोबाईल, संगणक, टीव्ही व इतर माध्यमांच्या आधारे शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. जर विद्यार्थ्याकडे अशा सुविधा नसतील तर त्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून शेजाऱयांच्या टीव्हीवर अभ्यासविषयक कार्यक्रम पाहण्याची व्यवस्था करता येईल. जर की-पॅड असणारे मोबाईल असतील तर रेडिओ पाठ ऐकण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे. फोनवरून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे, असेही आदेशपत्रकाद्वारे सुचविण्यात आले आहे. तर ऑनलाईन शिक्षणाची सुविधा असणाऱया विद्यार्थ्यांसाठी मागील वर्षाप्रमाणेच विविध अभ्यास आणि अभ्यासपुरक माहिती विद्यार्थ्यांना द्यावी, असे शिक्षण खात्याने सांगितले आहे.
विविध शैक्षणिक पर्यायांचा अवलंब…
त्याचप्रमाणे शिक्षण खात्याच्या दूरदर्शन चंदन वाहिनीवर प्रसारित होणारा ‘संवेद’ हा शैक्षणिक कार्यक्रम, आकाशवाणीवरील रेडेओ पाठ, दीक्षा ऍप, युटय़ूब चॅनेलवरील व्हिडीओ, पुस्तकांमधील क्यूआर कोडच्या आधारे पाठांची माहिती अभ्यासणे, शिक्षकांकडून तयार करण्यात येणाऱया ध्वनिफिती, चित्रफिती पालकांच्या मोबाईलवर पाठविता येतील, असे पर्यायही अनुसरण्याची सूचना शाळांना करण्यात आली आहे.