तज्ञांमध्ये मतभिन्नता, जुलैच्या तिसऱया आठवडय़ात भारतीय संघाचे सराव शिबिर शक्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) पुढील महिन्यात आपल्या काही अव्वल खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याची शक्यता असून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्यात सहभागी होणार का, याबद्दल आतापासूनच खल सुरु झाला आहे. तूर्तास, बीसीसीआय जुलैमध्ये तिसऱया आठवडय़ात प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यासाठी सुरक्षित ठिकाणाच्या शोधात आहे. हे शिबिर भरवणे शक्य न झाल्यास खेळाडू आपल्या आयपीएल संघांच्या ताफ्यात दाखल होतील, असे सध्याचे चित्र आहे.
धोनीचा मुख्य करारश्रेणीत समावेश नाही. त्याला वगळले गेले आहे. पण, प्रशिक्षण शिबिर आयोजित केले गेल्यास त्यात मुख्य करारात समाविष्ट नसलेले खेळाडू देखील असणार आहेत. वर्ल्डकप होणार असल्यास धोनीला बोलावले जाईल. पण, वर्ल्डकप होत नसेल तर निवड समिती वेगळा विचार करु शकते, असे माजी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना नमूद केले.
‘आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार का, याची मला कल्पना नाही. जर ही स्पर्धा होत असेल आणि त्या स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून प्रशिक्षण शिबिर भरवले जात असेल तर त्यात धोनी निश्चितपणाने असेल. पण, जर ती स्पर्धा होणार नसेल तर संघाकडे केएल राहुल, ऋषभ पंत व संजू सॅमसन असतीलच’, असे एमएसके प्रसाद म्हणाले. धोनी प्रशिक्षण शिबिरात असेल तर त्याच्याकडून युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल, याचा प्रसाद यांनी येथे उल्लेख केला.
हरभजन सिंगने मात्र प्रशिक्षण शिबिर झाल्यास युवा खेळाडूंना खेळवणे अधिक योग्य ठरेल, असे मत मांडले. ‘सुर्यकुमार यादव, यू-19 लेगस्पिनर रवी बिश्नोई, यशस्वी जैस्वाल यांच्यासारखे युवा खेळाडू प्रशिक्षण शिबिरात असतील तर मी त्याचे अधिक स्वागत करेन. अनुभवी खेळाडूंशी संवाद साधण्याची संधी अशा युवा खेळाडूंना मिळायला हवी. माझ्या मते टी-20 संघात सुर्यकुमार यादव असणेच अधिक बेहत्तर ठरेल’, असे हरभजनने नमूद केले.
माजी भारतीय यष्टीरक्षक व विश्लेषक दीप दासगुप्ताने निवड समितीने धोनीशी संवाद साधायला हवा, असे मत मांडले. धोनीला प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हायचे आहे का, याची माहिती त्यांनी घ्यायला हवी, असे दीपला वाटते. ‘सहा आठवडय़ांच्या प्रशिक्षण शिबिरात धोनी असेल तर त्याचा युवा यष्टीरक्षकांनाही लाभ होईल. पण, तो शिबिरात नसल्यास तरीही त्याला डावलून चालणार नाही. कारण, आयपीएल स्पर्धा झाली आणि त्यात चेन्नईतर्फे पाचव्या स्थानी फलंदाजीला उतरत धोनीने 500 पेक्षा अधिक धावांची आतषबाजी केली तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करु शकतो का?’, असा सवाल त्याने येथे उपस्थित केला.
सूत्रांच्या मते धोनी त्या प्रशिक्षण शिबिरात असणारच नाही!
संघातील निवडीशी संलग्न घटक असलेल्या एका सूत्राने सहा आठवडय़ांच्या शिबिरात धोनी सहभागी झाला तर ते आश्चर्याचे असेल, असा दावा केला. ‘धोनी मागील तब्बल वर्षभरापासून खेळलेला नाही. त्याचा फॉर्म काय स्थितीत आहे, याची कल्पना असण्याचे तर कारणच नाही. त्याचा मुख्य करार श्रेणीत समावेश नाही आणि गतवर्षी विंडीजविरुद्ध झालेल्या टी-20 साठी त्याला निवडले गेले नव्हते. या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही त्याला प्रशिक्षण शिबिरात दाखल होण्याची सूचना केली गेली तर तेच आश्चर्याचे ठरेल’, असे या सूत्राने नमूद केले.
नेहरा म्हणतो, हा माहीच्या इच्छेचा प्रश्न!
धोनीचा विश्वचषक जेता सहकारी सदस्य आशिष नेहराने धोनीला जोवर वाटते, तोवर त्याला संधी द्यायला हवी, असे मत येथे व्यक्त केले. ‘जर निवड समितीत असतो तर मी धोनीला प्राधान्याने पाचारण केले असते. पण, स्वतः धोनीला खेळायचे आहे का, हे येथे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. सरतेशेवटी हा धोनीच्या इच्छेचाही प्रश्न आहे’, असे नेहराने नमूद केले. भारतीय संघात पुन्हा दाखल होण्यासाठी आयपीएल खेळणे देखील धोनीसाठी पुरेसे असेल, असे नेहरा म्हणाला.