दिघंचीमधील नवजवान गणेश मंडळाचा उपक्रम
दिघंची / वार्ताहर
यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय अनेक गणेश मंडळांनी घेतला आहे.तर अनेकांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा मानस केला आहे.असाच सामाजिक निर्णय दिघंचीमधील तरटीमळा येथील नवजवान गणेश मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे.या मंडळाने गणेशोत्सवाला होणाऱ्या खर्चातून वस्तीकडे येणाऱ्या रस्त्यावरील चिलार उच्चाटन करण्याचे ठरवले.
दिघंची ते महाडीकवाडी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला चिलारी झुडूप असल्याने नागरिकांना वाहूतुकीस अडथळा निर्माण होत होता. यावर्षी गणेशोत्सव काळात खर्च होणार नसल्याने त्या पैशातून महाडिकवाडी रस्त्यावरील चिलार काढून रस्ता स्वच्छ करण्याचे नियोजन गणेश मंडळाच्या बैठकीत करण्यात आले.व प्रत्यक्षात कामाला सुरुवात देखील केली.
यावेळी मंडळाचे सदस्य अनिल मोरे, सचिन मोरे, नवनाथ मोरे, जितेंद्र मोरे, धनाजी निंबाळकर, गणेश जाधव, भावसाहेब मोरे, दादा मोरे आदींनी पुढाकार घेऊन एक नवीन संदेश लोकांना दिला असून सदर सामाजिक कार्यक्रमाचे गावातून कौतुक होत आहे.