वार्ताहर / देवराष्टे
चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यास 75 व्या स्वतंत्र्यादिना दिवशी आयएसओ मानांकन मिळाले. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते चिंचणी पोलिस ठाण्याचे एपीआय संतोष गोसावी यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षीतकुमार गेडाम उपस्थित होते.
जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षित गेडाम यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी स्मार्ट बनवण्यात आली होती. यामध्ये आयएसओ मानांकनासाठी सर्वच पोलीस ठाण्याचे प्रयत्न सुरू होते. मानांकनासाठी पोलीस ठाण्यातील भौतिक बाबींसह नागरिकांना दिली जाणारी सेवा, आधुनिकीकरण यासह अन्य बाबींचा विचार केला जातो. यामध्ये चिंचणी-वांगी पोलीस ठाणे अव्वल ठरले असून ठाण्यास आयएसओचे 9001: 2015 ए प्लस मानांकन मिळाले आहे. त्याबद्दल चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्यासह त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे.