प्रतिनिधी / मिरज
दरोडा, मारामारी, घरफोडी, धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविणे यासह डझनभर गंभीर गुह्यांची मालिका रचणाऱ्या मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोकेश सुतार टोळीला सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिह्यातून एक वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक दिक्षित गेडाम यांनी दिला आहे. मंगळवारी जिल्हा पोलिस प्रमुखांनी तसा आदेश पारीत केला आहे.
तडीपारीची कारवाई झालेल्यांमध्ये सुतार टोळीचा म्होरक्या लोकेश रावसाहेब सुतार (वय 26, रा. लिंगनूर), पपल्या उर्फ पपलेश महादेव पाटील (वय 22, रा. आरग), प्रविण उर्फ सुनिल रावसाहेब सुतार (वय 22, रा. लिंगनूर), सुखदेव उर्फ बंडय़ा हणमंत नाईक (वय 23, रा. आरग) आणि नागेश उर्फ बाळीशा रावसाहेब सुतार (वय 21, रा. लिंगनूर) या पाच जणांचा समावेश आहे. सदर टोळीवर 2016 ते 2020 या कालावधीत मिरज ग्रामीण, कवठेमहांकाळ, आष्टा, विटा आणि तासगांव या पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात चोरी, घरफोडी, दहशत माजविणे, हत्यार बाळगणे, दरोडा टाकण्याचा प्रयत्न असे 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत.