वृत्तसंस्था/ अम्मान (जॉर्डन)
माजी युवा वर्ल्ड चॅम्पियन साक्षी चौधरीने (57 किलो गट) विजयी धडाका कायम ठेवत आशियाई ऑलिम्पिक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिने आशियाई स्पर्धेतील रौप्यजेत्या व चौथ्या मानांकित थायलंडच्या निलावाने टेखशुफला पराभवाचा धक्का दिला. आता, टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरण्यासाठी साक्षीला केवळ एका विजयाची गरज आहे.
बुधवारी झालेल्या या चुरशीच्या सामन्यात 19 वर्षीय साक्षीने थायलंडच्या निलावानेला 4-1 असे पराभूत केले. पहिल्या फेरीत दोन्ही खेळाडूंत चांगलीच चुरस पहायला मिळाली. दुसऱया फेरीत मात्र निलावानेने जोरदार पंच लगावत साक्षीला चांगलेच बॅकफूटवर ढकलले होते पण साक्षीने वेळीच सावरत सामन्यात पुनरागमन केले. यानंतर, तिने आक्रमक खेळत 4-1 असा जिंकत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. आता, पुढील फेरीत तिची लढत दक्षिण कोरियाच्या एमशी होईल. पुरुष गटात वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यजेता मनीष कौशिक (57 किलो), सचिन कुमार (81 किलो) व आशिष कुमार (75 किलो) यांनी आपपल्या लढती जिंकून दुसरी फेरी गाठली आहे. आज त्यांच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढती होणार आहेत