प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात सलग दोन खुनाच्या घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बोगदा परिसरात घडलेला खून अगदी किरकोळ कारणातून घडल्याचे समोर आले आहे. दोन मारेकऱयांना पोलिसांनी अटक देखील केलेली आहे. गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी सध्या पोलीस पेट्रोलिंग करतच असतात मात्र वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी पेट्रोलिंग वाढवणार असून पोलीस दल गुन्हेगारी रोखण्यासाठी नेहमीच सज्ज राहील, असे जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी सांगितले. दरम्यान, शाहूपुरी पोलीस ठाण्याला अपुरी इमारत आहे. पोलीस ठाण्यासाठी दोन, तीन जागांची पाहणी केली असून लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
बोगदा परिसरात घडलेल्या खुनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय पंतगे उपस्थित होते.
जिल्हय़ातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस दलाने कारवाई सुरुच ठेवल्या आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशान्वये जिल्हय़ात पहिलीच एमपीएडी कायद्यान्वये कारवाई करुन पोलीस दलाकडून एका सराईत गुंडाला स्थानबध्द करण्यात आले आहे. काही टोळय़ांचे मोक्का कारवाईचेही प्रस्ताव तयार आहेत. जिल्हय़ात सध्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु झाली. निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी सर्वांनीच सहकार्य केले पाहिजे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु नये, तसे झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही बंसल यांनी यावेळी दिला.
सातारा शहरात सीसीटीव्ही बसवण्याबाबत जिल्हा नियोजन मंडळ तसेच नगरपालिकांच्या सहकार्यातून निधी उपलब्ध करुन ते बसवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सीसीटीव्ही बसवल्यामुळे गुन्हेगारी रोखण्यास तसेच पुरावे मिळण्यास चांगली मदत होते. त्याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्यात असून लवकरच सीसीटीव्ही बसवण्यात येतील, असेही बंसल यांनी यावेळी सांगितले.
शहरात पेट्रोलिंग व रात्रगस्त वाढवणार
पोलीस दलाचे पेट्रोलिंग स्ट्राँग आहे. मात्र, सातारा शहरात गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. चोऱया, चेनस्नेचिंग, दुचाकी चोऱयांबरोबरच आता सलग दोन खुनांच्या घटनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही ठिकाणी मोकळय़ा जागांवर रात्री उशिरापर्यंत नागरिक व युवक खुलेपणाने दारु पित आहेत. या सर्व गोष्टी रोखण्याबरोबरच खुल्या जागांवर दारु पिणारांवर कडक कारवाई जाईल. त्यासाठी सातारा शहर व परिसरात पेट्रोलिंग तसेच रात्रगस्त वाढवण्यात येईल.
शाहूपुरी पोलीस ठाण्याचे लवकरच स्थंलातर
सध्या शाहूपुरी पोलीस ठाण्यासाठी असलेली इमारत अपुरी आहे. मात्र, या ठाण्यासाठी शहरात दोन, तीन ठिकाणी जागांची पाहणी करण्यात आलीय. त्यातील काही जागांपैकी एक जागा अंतिम करुन त्यावर सुसज्ज इमारत बांधण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल. यासाठी पोलीस दलाकडून प्रयत्न सुरु असून काही कालावधीत शाहूपुरी पोलीस ठाणे नव्या जागेत स्थंलारित होईल, असेही बंसल यांनी सांगितले.