प्रतिनिधी /धारबांदोडा
सातपाल साकोर्डा येथील सातेरी स्नीपर्स क्लबच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गावातील युवावर्गासाठी खास विविध खेळांचे आयोजन करण्यात आले.
बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आहारतज्ञ रतील कवळेकर उपस्थित होते. सन्मानीय पाहुणे म्हणून अनिल सावळो गावकर, खास आमंत्रित म्हणून संतोष नाईक, चित्ररंजन देऊलकर, गणेश गावस व विशांत वेळीप उपस्थित होते.
आपले शरीर बळकट करण्यासाठी खेळ हा महत्त्वाचा असून सदृढ शरीरासाठी आपल्या दररोजच्या खाण्यात घरी बनवलेल्या पदार्थांचा वापर केला पाहिजे. शरीर बळकट करण्यासाठी बाहेरील पौष्टिक आहाराची गरज नाही असे आहारतज्ञ रतील कवळेकर यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.
खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असून माणसाला पराभवातून जिंकण्याची क्षमता खेळ देत असतो. खेळामुळे आपण कोणताही निर्णय पटकन घेऊ शकतो. ज्याला खेळाची आवड आहे त्याने केवळ खेळाकडे लक्ष केंद्रीत करावे. त्यामुळे त्याला राज्याचे तसेच देशाचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त होऊ शकते, असे अनिल गांवकर याप्रसंगी म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक देसाई, दिग्वीजय उसपकर व गुरु गावकर यांनी केले तर दीपक गांवकर यांनी आभार मानले.