महिला दुहेरीत नादियासह उपांत्यपूर्व फेरीत धडक
होबार्ट / वृत्तसंस्था
भारताची आघाडीची टेनिसतारका सानिया मिर्झाने होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारत विजयी पुनरागमन केले. आपली युक्रेनची सहकारी नादिया किशेनॉकसह तिने सहज बाजी मारली व उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. सानिया दोन वर्षांनंतर प्रथमच डब्ल्यूटीए स्पर्धेत उतरत आहे.
सानिया व किशेनॉक या जोडीने मंगळवारी जॉर्जियाची ओक्साना कॅलाश्निकोव्हा व जपानाची मियू काटो यांना एका सेटच्या पिछाडीवरुन मात दिली. त्यांनी पहिला सेट 2-6 फरकाने गमावल्यानंतर 7-6 (3), 10-3 असे सलग सेट जिंकत विजयश्री खेचून आणली. सानिया-किशेनॉक यांची पुढील लढत अमेरिकेच्या व्हॅनिया किंग व ख्रिस्तियाना मॅकहॅले यांच्याविरुद्ध होईल. व्हॅनिया-ख्रिस्तियाना या जोडीने स्पेनच्या चौथ्या मानांकित जॉर्जिना गार्सिया पेरेझ व सारा सॉरिबेस टोर्मोविरुद्ध 6-2, 7-5 अशा एकतर्फी फरकाने विजय संपादन केला.
33 वर्षीय सानिया मिर्झाने एप्रिल 2018 मध्ये अपत्यप्राप्तीसाठी व्यावसायिक टेनिसमधून ब्रेक घेतला. पण, त्यापूर्वी अनेक दुखापतींचा ससेमिरा तिच्या पाठीशी लागला होता. त्यामुळे देखील तिच्या कारकिर्दीत बराच खंड येत राहिला. सानियाने पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी निकाह केला आहे.
‘माझ्यासाठी हा माझ्या आयुष्यातील काही खास दिवसांपैकी एक आहे. माझे पालक आणि माझा छोटा मुलगा इझहान सामना पाहण्यासाठी आले आणि आम्ही आगेकूच करु शकलो, याचा आनंद आहे’, असे ट्वीट सानियाने यावेळी केले.
सानिया व किशेनॉक या जोडीला पहिल्या फेरीत अजिबात सूर सापडला नाही. एकवेळ तर ते सात ब्रेकपॉईंटचा लाभही घेऊ शकले नाहीत. दुसऱया सेटमध्ये मात्र त्यांनी दमदार मुसंडी मारली. त्यानंतर तिसऱया सेटमध्ये त्यांनी आपला खेळ आणखी उंचावत विजयावर शिक्कामोर्तब केले.
सानिया यापूर्वी ऑक्टोबर 2017 मध्ये चीन ओपन स्पर्धेच्या माध्यमातून आपली शेवटची व्यावसायिक स्पर्धा खेळली होती. नंतर गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती बाहेर फेकली गेली. सानिया 2013 मध्ये एकेरीतून निवृत्त झाली असून त्यापूर्वी 2007 मध्ये एकेरी मानांकनात तिने कारकिर्दीतील सर्वोत्तम 27 व्या स्थानापर्यंत झेप घेतली होती. नंतर मात्र मनगटाच्या व गुडघ्याच्या दुखापतीने तिला सातत्याने सतावत ठेवले आहे.