करुळ येथील श्रद्धा शिवडावकरची सैन्यदलात निवड : सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सिंधुकन्येचा गौरव
दिगंबर वालावलकर / कणकवली:
माध्यमिक शिक्षण घेत असतानाच तिने देशसेवा करण्याचे ध्येय बाळगले. अभ्यास, मेहनत व चिकाटीच्या जोरावर तिने भारतीय सैन्य दलाच्या लेफ्टनंट पदापर्यंत मजल मारली. तिची देशाप्रती असलेली ‘श्रद्धा’ फळाला आली. सैन्यदलात लेफ्टनंट पदावर तिला नियुक्तीही मिळाली आहे. ही यशोगाथा आहे, कणकवली तालुक्यातील करुळ-फोपेवाडी येथील श्रद्धा विलास शिवडावकर या सिंधुकन्येची. जिल्हय़ाच्या शिरपेचात श्रद्धाच्या निवडीमुळे मानाचा तुरा रोवला गेला आहे. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला श्रद्धाला नियुक्तीचे पत्र देत भारतीय लष्करानेही एकप्रकारे या कोकणकन्येचा गौरव केला आहे.
करुळ हे तसे सर्वांना परिचीत असलेले गाव. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचे गाव. सिंधुदुर्गच्या कन्येने देशाच्या सैन्यदलात अधिकारीपदावर आपली मोहोर उमटवत सिंधुदुर्गसह कोकणचे नाव उज्वल केले आहे. 27 मार्च रोजी श्रद्धा लेफ्टनंट पदावर रुजू होणार आहे.
एनसीसी नंतर धेय्याला आकार!
श्रद्धाचे बालपणापासूनचे शिक्षण मुंबईत अंधेरी येथे झाले. दहावीनंतर तिने देशसेवा करण्याचे ध्येय बाळगले. श्रद्धाचे माध्यमिक शिक्षण अंधेरी येथील सीडी बर्फीवाला हायस्कूल येथे, तर अकरावी-बारावीचे महाविद्यालयीन शिक्षण गोरेगाव येथील पाटकर कॉलेज येथे झाले. बीएससी-आयटीचे शिक्षण रुपारेल कॉलेजमधून पूर्ण केले. तिने 2 वर्षे एनसीसीमध्ये शिक्षण घेतले. या दोन वर्षाच्या शिक्षणानंतर श्रद्धाच्या देशसेवेत काम करण्याच्या ध्येयाला आकार मिळायला सुरुवात झाली.
जून 2016 पासून लष्करात भरतीसाठी प्रयत्न!
मुंबईत असलेल्या श्रद्धा व तिच्या कुटुंबियांनी सांगितले, एनसीसीमध्ये घेतलेल्या प्रशिक्षणाचा चांगला फायदा या पदावर पोहोचण्यासाठी उपयोगात आला. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर जून 2016 पासून, भारतीय सैन्य दलात भरतीसाठी श्रद्धाचे प्रयत्न सुरू होते. लेफ्टनंट पदासाठी आठवेळा मुलाखती दिल्यानंतर मेरिट यादीत श्रद्धाचे नाव आले. श्रद्धा व तिच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अखेर श्रद्धाची देशसेवेची इच्छा पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागली. वयाच्या 25 व्यावर्षी या कोकणकन्येची देशाच्या लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली ही जिल्हय़ाच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे.
पंजाबमध्ये लेफ्टनंट म्हणून नियुक्ती!
श्रद्धाची पंजाब-जालंदर येथे लेफ्टनंट पदावर नियुक्ती करण्यात आली. 7 मार्च रोजी भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर नियुक्तीचे अधिकृत पत्र श्रद्धाच्या हाती पडले अन् तिचे स्वप्न साकार झाले. तिचे आई-वडील शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. लेफ्टनंट पदावर काम करताना सैन्य दलातील जवानांच्या कामावर ‘सुपरव्हिजन’ करण्याची जबाबदारी या कोकणकन्येवर असणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवासाठी श्रद्धा कुटुंबियांसोबत आपल्या गावी येते.
11 महिन्यांचे प्रशिक्षण पहिल्याच टप्प्यात पूर्ण
श्रद्धाच्या लेफ्टनंट पदावर नियुक्तीपूर्वी चेन्नई येथे ऑल इंडिया स्तरावरील 11 महिन्यांचे लेफ्टनंट पदाचे खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पहिल्याच टप्प्यात तिने पूर्ण केले. ध्येय निश्चित करून मेहनतीने काम केले, तर ध्येय गाठता येते, असे श्रद्धाने सांगितले. चेन्नई येथे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर श्रद्धासोबत तिचे वडील विलास शिवडावकर, आई सुप्रिया, आजोबा शांताराम, आजी लक्ष्मी, भाऊ सागर हे तेथे आनंदोत्सवात सहभागी झाले होते.