क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सुपर किंग्स संघाने स्पार्टन संघाचा 38 धावांनी तर बीएससी डेपो टायगर्स संघाने ग्लॅडिएटर संघाचा 15 धावांनी पराभव करून एस.पी. घाळी चषक सोळा वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. विराज हावेरी (सुपर किंग्स), आकाश कुलकर्णी (बीएससी टायगर्स) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात सुपर किंग्स संघाने 23 षटकात 7 बाद 143 अशी मोठी धावसंख्या रचली. त्यात विराज हावेरीने सर्वाधिक 37, मनिकांत बुकिटगारने 32, रोहित वायने 17 तर चंद्रकांत कलबुर्गीने 13 धावा केल्या. स्पार्टनतर्फे आदित्य पाटीलने 3, मोहिद सय्यदने 2 तर आदर्श सिंग व अमोघ बदामी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना स्पार्टन संघाचा डाव 19.1 षटकात 105 धावांत आटोपला. मोहिद सय्यदने 21, आदित्य पाटीलने 18, सुजल काकतकरने 16 तर स्वरूप साळुंखेने 12 धावा केल्या. सुपर किंग्सतर्फे मनिकांत बुकिटगार, संकेत, वैभव करीसकनावर, रोहित यारीसीमी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
दुसऱया उपांत्य सामन्यात बीएससी डेपो टायगर्स संघाने 22.1 षटकात सर्वबाद 120 धावा केल्या. कर्णधार आकाश कुलकर्णीने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत 45 धावा केल्या. आशुतोष हिरेमठने 23 व हर्ष पटेलने 13 धावा केल्या. ग्लॅडिएटरतर्फे कवीश मुकण्णावरने 5 तर गौरव काटनेने 2 व नमन ओळकर आणि भुवन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ग्लॅडिएटर संघ बीएससी टायगर्स संघाच्या शानदार गोलंदाजीपुढे 23 षटकात 4 बाद 105 धावा जमवू शकला. त्यात कवीश मुकण्णावरने 39, अमोल पागदने 16 धावा केल्या. बीएससीतर्फे लाभ, वेदांत पाटील, हर्ष पटेल व आकाश कुलकर्णी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रमुख पाहुणे युनियन जिमखाना सचिव प्रसन्ना सुंठणकर, विजया क्रिकेट अकॅडमी अध्यक्ष डॉ. प्रकाश पाटील व चन्नवीर मुंगुरवाडी यांच्या हस्ते सामनावीर विराज हावेरी व इम्पॅक्ट खेळाडू मनिकांत बुकिटगार यांना तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुण्या कल्पवृक्ष संघटनेच्या अध्यक्षा ज्योती शेट्टी, पूजा खडबडी तेजस्विनी साळुंके व माधुरी चव्हाण यांच्या हस्ते सामनावीर आकाश कुलकर्णी व इम्पॅक्ट खेळाडू कवीश मुकण्णावर यांना चषक देवून गौरविण्यात आले.
गुरूवारी स्पर्धेला सुटी असून, शुक्रवारी अंतिम सामना व्ही. व्ही. सुपरकिंग्स व बीएससी डेपो टायगर्स यांच्यात सकाळी 10 वा. खेळविण्यात येणार आहे. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.