देवराज अर्स वसतिगृहात 100 बेडची सुविधा
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड मिळणे कठीण बनले आहे. त्यामुळे महापालिका व समाज कल्याण खाते व आरोग्य खात्याच्यावतीने सुभाषनगर येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी सध्या 45 कोरोनाबाधित दाखल झाले असून आरोग्य खात्याच्यावतीने देखरेख करण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या जीवघेणी बनली आहे. ऑक्सिजनचा तुटवटा, बेडची कमतरता आणि रेमडेसिवीर इंजेक्शनच्या टंचाईमुळे कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याने खासगी रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. तसेच महापालिका, आरोग्य खाते आणि समाज कल्याण खात्याच्यावतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. देवराज अर्स वसतिगृहामध्ये 100 खाटाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. लक्षणे नसलेल्या बाधितांवर याठिकाणी उपचार करण्यात येत आहेत. घरी विलगीकरण करण्याची सोय नसलेल्या कोरोना बाधितांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी रविवारपर्यंत 45 कोरोनाबाधित दाखल झाले असून आरोग्य खात्याच्यावतीने उपचार करण्यात येत आहेत.
आरोग्य खात्याचे मेडिकल ऑफिसर व पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. चोवीस रुग्णांवर नजर ठेवण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पण याठिकाणी ऑक्सिजन युक्त बेड उपलब्ध करण्यात आले नाहीत. मात्र वृद्ध रुग्णांसाठी ऑक्सिजनची तात्पुरती सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.