सोलापूर/प्रतिनिधी
शहरातील काँग्रेस भवनाच्या बाहेरील बाजूस लावण्यात आलेल्या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे पोस्टरवर शाई फेक अन् दगड भिरकावल्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला. अज्ञात माथेफिरूकडून झालेल्या या घटनेचा काँग्रेसकडून निषेध करण्यात येत आहे.
काँग्रेस भवन परिसरात काँग्रेस अंतर्गत विविध आघाड्यांचे फलक आहेत. या फलकांवर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष प्रकाश वाले तसेच विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिमा आहेत. शनिवारी सकाळी अज्ञात माथेफिरूने या फलकांवर काळी शाई फेकली. त्यानंतर दगडफेक केली.
घटनेची माहिती समजताच शहराध्यक्ष प्रकाश वाले तसेच इतर पदाधिकारी काँग्रेस भवनात दाखल झाले. याबाबतची माहिती जेलरोड पोलीस ठाण्याला देण्यात आली. दरम्यान फलक स्वच्छ करून घेण्यात आला. घडलेल्या प्रकाराचा छडा लावून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार देण्यात येईल, असे सांगून शहराध्यक्ष वाले यांनी काँग्रेस मधील कोणत्याही व्यक्तीने हा प्रकार केला नसल्याचे म्हंटले. काँग्रेस पक्षाचे काम जोरात सुरू असल्याने कृत्य केले असल्याचा दावा वाले यांनी केला आहे. शाई आणि दगडफेक करणारे दुचाकीवरून आले होते अशी माहितीही वाले यांनी यावेळी दिली. या घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन शहराध्यक्ष वाले यांनी केले असल्याचे सांगितले.