ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार व्हावेत यासाठी मुंबईतील खाजगी दवाखाने, नर्सिंग होम सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तरी देखील काही ठिकाणी या सेवा सुरू झाल्या नाही आहेत. त्यामुळे आता जर कोणी नर्सिंग होम सुरू केले नाही तर थेट परवाना रद्द करण्यात येईल असा आदेश मुंबई महापालिका आयुक्तांनी दिला आहे.
तसेच बंद असणारे दवाखाने सुरू न केल्यास ‘साथरोग कायदा 1897’ नुसार कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.
यासाठी महापालिकेच्या 24 विभागातील सार्वजनिक आरोग्य खात्याचे वैद्यकीय अधिकारी आपल्या कार्यक्षेत्राचे सर्वेक्षण करतील आणि जे नर्सिंग होम आणि दवाखाने बंद असतील त्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही सुरू केली जाईल.
तसेच दवाखान्यात येणाऱ्या व्यक्तींच्या शरीराचे तापमान ‘विना स्पर्श’ पद्धतीने तपासावे. संबंधित व्यक्तीच्या शरीराचे तापमान 98.6 फॅरनहाईट किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास अशा व्यक्तींना तात्काळ महापालिकेच्या दवाखान्यात पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एखाद्या व्यक्तीची लक्षणे ही ‘कोरोना कोविड 19’ सारखी असल्यास अशा व्यक्तींना महापालिकेने निर्देशित केलेल्या केंद्रांवर पाठवावे. असे निर्देशही देण्यात आले आहेत.