संताप व्यक्त करण्यासाठी लोकांकडून पंचिंग बॅगसारखा वापर
जगात जितके लोक आहेत, त्याहून अधिक त्यांच्या चिंता आहेत. तणाव, समस्या, गुंतागुंत, चिंतांवर प्रत्येक जण वेगवेगळय़ा प्रकारे तोडगा काढतो. कुणी ध्यानधारणा करतो, तर कुणी संगीत ऐकतो, तर काही जण झोपून स्वतःचा तणाव कमी करू पाहतात. पण काही असेही लोक आहेत, जे ओरडून किंवा कुणाला मारून स्वतःमधील संतापाला वाट मोकळी करून देण्यावर विश्वास ठेवतात. अशा लोकांना तुर्कस्तानातील एक व्यक्ती मागील काही काळापासून मदत कर तआहे. याचमुळे त्याला माणसांचा पंचिंग बॅग या नावाने देखील ओळखले जाते.
तुर्कस्तानचा हसन रिजा गूने मागील 10 वर्षांपासून स्ट्रेस कोच म्हणून काम करतोय. त्याला तुर्कस्तानातील पहिला स्ट्रेस कोच मानले जाते. त्याची उपचार करण्याची पद्धत वेगळी असल्यानेच लोक दंग होतात. हसन स्वतःच्या ग्राहकांकडून स्वतःला बडवून घेतो आणि असे करून तो यातून पैसे कमावतो.
स्ट्रेस कोच
जीवनात लोकांना मोठा तणाव आणि टेन्शन आहे. अनेकदा परस्परांमध्ये शेअर करूनही हा ताण दूर होत नाही. अशा स्थितीत या लोकांच्या मदतीसाठी मी पुढे होतो आणि स्वतःच्या संतापाला वाट मोकळी करून देण्याचे साधन उपलब्ध करतो असे हसन यांचे सांगणे आहे. हसन यांनी 2010 पासून हे काम सुरू केले होते. आता ते लोकांना स्वतःला मारू देतात.
बहुतांश क्लायंट महिला
दर दिवशी 3-4 क्लायट्संसोबत 10 ते 15 मिनिटांचे सेशन करतो. या सेशनदरम्यान अनेक सुरक्षा उपकरणे परिधान करतो यामुळे गंभीर ईजा होत नाही. केवळ मनोरंजनासाठी कुणाचा मार खाण्यास जात नाही. प्रथम स्वतःच्या रुणाची तपासणी करतो आणि खरोखरच तो नैराश्यात असल्यास त्याला पंचिंग थेरपी देत असल्याचे हसन यांनी सांगितले. माझ्या क्लायंटसपैकी 70 टक्के महिला असतात. कार्यालयीन नोकरीमुळे त्या त्रस्त असतात असे त्यांचे म्हणणे आहे. हसन यांच्या कमाईबद्दल काहीच सांगण्यात आलेले नाही, पण या कामातून त्यांना मोठी कमाई प्राप्त होत असल्याचा दावा करण्यात येतो.