आरोग्यमंत्र्यांचा पुढाकार
प्रतिनिधी/ पणजी
आरोग्य तथा महिला बालकल्याण व उद्योगमंत्री विश्वजित राणे यांनी आज शनिवारी आयोजित केलेल्या एका विशेष भव्य दिव्य अशा कार्यक्रमास केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व राज्यातील 10 हजार महिला उपस्थित राहणार आहेत.
यशस्वीनी आणि स्वावलंबन या महिलांसाठी दोन विशेष योजना फेरदुरुस्तीनंतर आजपासून कार्यान्वित करण्यात येणार आहेत. ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर एका भव्य कार्यक्रमात योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे देखील या समारंभाला उपस्थित राहतील.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी या संदर्भात विशेष पुढाकार घेतलेला आहे. आपल्या या समारंभात विश्वजित राणे हे महिलांचे शक्तिप्रदर्शन घडवून आणित आहे. राज्यातील 10 हजार महिला या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम त्यासाठी सज्ज करण्यात आला आहे. आरोग्यमंत्र्यांनी तरुण भारतशी बोलताना स्पष्ट केले की हा कार्यक्रम दु. 2.30 वा. पासून सुरू होईल. महिला व बालकल्याण खात्यातर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे व आरोग्य खात्याने त्यात सहभाग घेतलेला आहे.
500 मंडळांना देणार योजनांचा लाभ
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की, यशस्वीनी योजनेंतर्गत महिला मंडळांना विविध उपक्रम राबविण्यासाठी रु. 30 हजार दिले जातील. तर स्वावलंबी योजनेंतर्गत सेल्फ हेल्प गटांना रु. 5 लाख प्रत्येकी आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे. आजच्या दिनी सुमारे 500 मंडळांना पहिल्या टप्प्यात योजनेचा लाभ होईल. महिला स्वावलंबी बनाव्या व त्यांनी लघु उद्योग सुरू करावे, त्यांनी निर्माण केलेल्या वस्तू हस्तकला विकास महामंडळाच्या दालनातून विक्रीस उपलब्ध करण्याचा इरादा देखील उद्योगमंत्र्यांनी व्यक्त केला.
स्तन कर्करोगाची चाचणी
या मुख्य सोहळ्याला जोडूनच स्टेडियमवर स्तनावरील कर्करोग व सर्वायकल कर्करोगांवर निदान तथा उपचार योजना अंतर्गत नामवंताना पाचारण करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य फाऊंडेशनचे अध्यक्ष के श्रीनाथ रेड्डी, प्रॉक्टर अँड गॅम्बल चे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद थत्ते, महिला बालकल्याण सचिव निला मोहनन, सी. आर. गर्ग समारंभाला उपस्थित राहतील. स्वास्थ्य सखी योजनेंतर्गत गोवा सरकार लवकरच प्रसुतीच्या वेळी अडचणीत येणाऱया महिलांची विशेष काळजी घेण्यासाठी खास यंत्रणाही राबविणार असल्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.