स्वप्नात 2120 सालची वर्तमानपत्रे आणि इतर माध्यमांवरच्या ब्रेकिंग न्यूज दिसल्या.
1920 साली प्लेगची साथ आली होती. 2020 साली कोरोनाची साथ आली होती. 2120 साली तिसरी साथ आली. अवकाशातून लांबून एक धूमकेतू चाललेला होता. त्या धूमकेतूचा अभ्यास करण्यासाठी चीनचा एक उपग्रह त्यातून आरपार गेला. त्यातल्या ग्रहांवरचे अवशेष उचलून आणले. फोटो काढले. त्या भानगडीतून एक व्हायरस सूर्यमालेत पसरला. आधी मंगळावरच्या देशांमध्ये, नंतर पृथ्वीवर.
आता पुण्यातल्या दाट वस्तीच्या भागांना पेठा म्हणतात. तसे तेव्हा पृथ्वीवरच्या देशांना लोक पेठांमधले देश म्हणत होते. तर या पेठांमध्ये संसर्ग वाढला. लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून सरकारने विविध उपग्रहांवर रेशन दुकाने उभारली. तिथून लोकांना ड्रोनच्या माध्यमांतून घरपोच वस्तू पाठवायला सुरुवात केली. ड्रोनमधल्या संगणकाला घरातील माणसांचे चेहरे आणि आधार कार्ड दाखवलं होतं. माणसं रेशन कार्ड घेऊन समोर आली की ड्रोन त्यांचे चेहरे चेक करून त्यांच्या पुढय़ात पार्सल टाकत होता.
पृथ्वीवर जुन्या संस्कृतीचा अभिमान आणि त्याच वेळी आपण अतिशय हुश्शार, आधुनिक असल्याचा गर्व असलेले अनेक भूभाग होते. तिथल्या नागरिकांना पुणेकर म्हटले जाई. कारण त्यांचे वंशज शंभर वर्षांपूर्वी पुण्यातून इकडे स्थायिक व्हायला आले होते. शंभर वर्षांपूर्वी व्हॉट्सअप नावाच्या अतिशय भारदस्त, विश्वासपात्र आणि प्रकांड पंडितांच्या संपादकत्वाखाली प्रसूत होणाऱया वृत्तमालिकेतून बातम्या पसरल्या होत्या की महाराष्ट्राचा युपी झाला, महाराष्ट्राचा बिहार झाला. तेव्हा अनेक पुणेकरांनी आपल्या इस्टेटी विकल्या आणि आधी युपी-बिहारमध्ये स्थायिक व्हायला गेले. तिथून ते जगभर पसरले. 2120 साली सूर्यमालेत नव्या रोगाची साथ पसरली. हे नागरिक आजोबांच्या, पणजोबांच्या आठवणी सांगू लागले. शंभर वर्षांपूर्वी चीनमुळे कोरोना पसरला त्याच्या आठवणी निघाल्या. चीनला शिक्षा करण्यासाठी चिनी मेणबत्त्या, फटाके, लाईटच्या माळा वगैरेवर बहिष्कार टाकून चीनला कसे जेरीस आणले त्या शौर्यकथांची पारायणे झाली. दरम्यान पेठांमधल्या देशांची सरकारे रडकुंडीला आली. कारण नागरिक सरकारच्या सूचना पाळत नव्हते. अंतराळात गर्दी करू नका, प्रत्येकाला घरपोच मिळेल असे सांगूनही आपापल्या छोटय़ा यानातून उपग्रहाच्या कक्षेत गर्दी करीत होते. प्रणयी तरुण तरुणी चंद्रावर किंवा शुक्राच्या उंचवटय़ावर दाटीवाटीने बसत होते. अशा लोकांपुढे सरकार तरी काय करणार.