प्रतिनिधी /पणजी :
बांबोळी येथे हर्षद मोदी यांना नगरनियोजन खात्याने बेकायदेशीरपणे 77 भूखंड करण्यास अनुमती दिली असून त्या करीता डोंगराची कापणी करण्यात आल्याची माहिती गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली. या प्रकणात मोठा भ्रष्टाचार असून त्याची चौकशी करावी, अन्यथा ते लोकायुक्ताकंडे नेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की 2011 च्या प्रादेशिक आराखडय़ानुसार मोदी यांना सनद देऊन 17 भूखंडासाठी अनुमती नगर नियोजन खात्याने दिली होती. तथापि नंतर तो 2011 चा आराखडा रद्द करण्यात आला. त्यामुळे सनद भुखंडासाठी देण्यात आलेला परवानाही रद्द झाला. 2021 चा प्रादेशिक आराखडा तयार करण्यात आला आणि सध्या तो वापरात आहे. त्यानुसार मोदींची जागा ‘नो डेव्हलपमेंट झोन’ करण्यात आली असून तेथे बांधकाम करता येत नाही व भूखंड करण्यासही मनाई आहे, असे असतानाही तेथे आता डॉ. सावंत यांच्या सरकारने व नगरनियोजन खात्याने मोदी यांना 77 भूखंड करण्यास परवाना दिला आहे. ते काम मोठमोठे पत्रे लावून जोरात चालू आहे. त्या कामासाठी 2011 चा प्रादेशिक आराखडय़ानुसार देण्यात आलेली सनद वापरण्यात येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
झाडांच्या कत्तली करण्यास वन खात्याची परवानगी नाही, नगर नियोजन कायदा 16 बी या कलमाखाली नेमण्यात आलेल्या समितीने देखील त्यास हरकत घेतली होती, असे असूनही सर्व नियम धाब्यावर बसवून जमिनीचे रुपांतर करण्यास अनुमती देण्यात आली आहे. हे सर्व बेकायदेशीर असल्याचे सांगून त्याची आरटीआय कागदपत्रे चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत सादर केली. काँग्रेसचे प्रवक्ते तुलियो डिसोझा यांनी नगरनियोजन मंडळाकडून मोठय़ा प्रमाणात जमिनीचे रुपांतरण होत असल्याचे सांगून त्याच्या वृत्तपत्रातील मोठमोठय़ा जाहिराती पत्रकारांना दाखवल्या.