ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी लिहिलेल्या ‘सनराइज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. या पुस्तकाच्या निमीत्ताने आणखी एक वाद निर्माण झाला असुन. या पुस्तकातील सहाव्या प्रकरणामध्ये असं म्हटलंय की, हिंदुत्वाच्या नव्या मार्गाने सनातन धर्म आणि ऋषीमुनींचा प्राचीन हिंदू धर्म बाजूला सारला जात असून ते इस्लामिक जिहादी संघटना बोको हराम आणि ISIS प्रमाणे आहे. दरम्यान यावरुन भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस पक्ष द्वेषाचे राजकारण करत असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.
यामुळे सलमान खुर्शीद यांनी यावर स्पष्टीकरण देणे अपेक्षित होते. खुर्शीद यांनी यावर शनिवारी उत्तर प्रदेशातील संभल येथील कल्की धाम येथे आयोजित कार्यक्रमात स्पष्टीकरण दिले आहे. मी हिंदुत्व आणि आयसीस एकच आहेत असं म्हटलं नसून दोन्ही एकसारखे असल्याचं म्हटलंय, असं सलमान खुर्शीद म्हणाले.तसेच “दहशतवादी संघटना आयसीस आणि हिंदुत्व एकच आहेत असे मी माझ्या पुस्तकात म्हटले नाही. पण दोन्ही एकसारख्या आहेत, असं मी म्हटलंय. ISIS आणि बोको हराम इस्लाम धर्माचा गैरवापर करतात, असंही मी म्हटलंय. परंतु इस्लामच्या अनुयायांपैकी कोणीही यावर आक्षेप घेतला नाही. मी त्यांच्या धार्मिक भावना दुखावत आहे, असे कोणीही म्हटले नाही.”
“काही लोक हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते हिंदू धर्माचे शत्रू आहेत आणि त्यांना भीती वाटते की त्यांचे सत्य समोर येईल. त्यांचे सत्य उघड करणाऱ्या कोणत्याही पुस्तकावर ते बंदी घालतील. जर मला कोणत्याही धर्मापासून अडचण असती तर मी इथे आलो नसतो. माझा विश्वास आहे की हिंदू धर्म जगात शांततेचा प्रसार करतो, असं खुर्शीद म्हणाले आहेत. त्यामुळे आरोप करणाऱ्या संघटना यावर काय भुमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.