भाजप उमेदवार पापिया अधिकारी यांचे प्रतिपादन
टॉलिवूड कलाकार आणि बंगालच्या हावडा जिल्हय़ातील उलबेरिया दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार पापिया अधिकारी यांनी ‘सबका साथ, सबका विश्वास’मध्ये विश्वास असल्याचे म्हटले आहे. उपनिषदांचा अभ्यास करत असून त्यात लोकांमध्ये भेदभाव करण्याची शिकवण नाही. बंगालमध्ये भाजपचे सरकार येताच हिंदूंप्रमाणेच मुस्लिमांचीही पूर्ण काळजी घेतली जाणार असल्याचे प्रतिपादन पापिया यांनी केले आहे.
बंगालमधील सद्यस्थितीतील वातावरणात महिलांचा सन्मान होत नाही. महिलांना मारहाण करण्याचे प्रकार वाढले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतःच विचित्र वर्तन करत आहेत. राजकारणासारख्या अत्यंत गंभीर विषयाला त्यांनी खेळ समजले आहे. ममता बॅनर्जी सत्तेवरून हटणे अत्यंत आवश्यक असल्याचे पापिया म्हणाल्या. ममता बॅनर्जी ज्याप्रकारे स्वतःचा जखमी पाय दाखवत आहेत, ते योग्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
राज्यातील जनता परिवर्तन इच्छित आहे. उलबेरिया दक्षिण मतदारसंघात मागील 10 वर्षांमध्ये कुठलीच विकासकामे झालेली नाहीत. येथे नदीवर एक घाट देखील नाही. रस्त्यांवर लाइट्स नाहीत. उद्योगांच्या नावाने दुष्काळ आहे. केवळ कटमनीचा प्रकार सुरू असल्याचा दावा अधिकारी यांनी केला आहे.
भाजप सरकारच्या कार्यकाळात सर्वांचा विचार केला जाणार आहे. आमचा पक्ष हिंदू आणि मुस्लीम यांच्यात कुठलाच फरक करत नाही. तीन तलाक कायद्यामुळे मुस्लीम महिलांना मोठा लाभ झाला आहे. बंगालमधील मुस्लिमांच्या कल्याणासाठीही रोडमॅप तयार करण्यात येणार असल्याचे पापिया यांनी म्हटले आहे.
मागील 10 वर्षांपासून टॉलिवूडमध्ये तृणमूल काँग्रेसची हुकुमशाही सुरू आहे. कुणाला काम मिळणार आणि कुणाला नाही याचा निर्णय तृणमूलचे नेते घेत आहेत. टॉलिवूडमध्ये तृणमूलचे सिंडिकेट सुरू आहे. मी देखील याला बळी पडले आहे. ही हुकुमशाही संपविण्यासाठी परिवर्तनाची गरज आहे. भाजप सत्तेवर येताच कुठल्याही प्रकारचा पक्षपात केला जाणार नसल्याचे पापिया यांनी सांगितले आहे.
बंगालमधील निवडणुकीच्या काळात होणारा हिंसाचार रोखण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल घडवून आणावा लागणार आहे. शालेय अभ्यासक्रमात उपनिषदांना सामील करणे आवश्यक आहे, तेव्हाच प्रेम आणि सहानुभूतीची भावना निर्माण होऊ शकेल. सध्या लोकांच्या मनात परस्परांविषयी ईर्ष्या आणि क्रोध भरलेला आहे. जगभरात उपनिषदांचे शिक्षण मिळते, तर मग बंगालमध्ये का नाही असे प्रश्नार्थक विधान त्यांनी केले आहे.