ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेशात पंचायत राज संस्थांच्या निवडणुका डिसेंबर आणि जानेवारीमध्ये होतील, अशी माहिती हिमाचल प्रदेशचे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री वीरेंद्र कंवर यांनी दिली.
ते म्हणाले, प्रदेशात नवीन पंचायत स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली असून हे काम वेळेत पूर्ण होईल. प्रदेशात मागच्या वेळी डिसेंबर आणि जानेवारी पंचायत राज संस्थांच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या आणि 22 जानेवारीला ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.
22 जानेवारी 2021 ला पंचायती राज संस्थांच्या प्रतिनिधींचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. राज्य निवडणूक आयोगाला कायद्यानुसार 5 वर्षांच्या आत निवडणूक करणे बंधनकारक आहे. पंचायतीच्या स्थापनेसाठी कमीत कमी असा काही कालावधी निश्चित नसल्याने सरकार नवीन पंचायतीच्या स्थापनेसाठी अधिक वेळ घेऊ शकणार नाही.
नवीन पंचायातीसाठी 16 ऑगस्ट रोजी प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यासाठी जवळपास 470 प्रस्ताव आले आहेत. राज्य सरकार नवीन पंचायतीसाठी लवकरच निकषही निश्चित करेल आणि हे निकष पूर्ण करणाऱ्या भागांना नवीन पंचायतीचा दर्जा दिला जाणार आहे. निकषांमध्ये त्या भागातील लोकसंख्या, घरांची संख्या आणि पंचायत मुख्यालयापासूनचे अंतर यावर आधारित असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.