वार्ताहर/ तवसाळ
गुहागर तालुक्यातील हेदवी समुद्रकिनारी खडकामध्ये सुमारे 7 फूट लांबीचा डॉल्फीन मासा मृतावस्थेत आढळून आला आहे. या डॉल्फीनचा किनारपट्टीवरील खडकामध्ये अडकून मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
7 मेच्या पौर्णिमेला समुद्राला मोठी उधाणाची भरती आली होती. भरतीमुळे डॉल्फीन मासे मोठय़ा प्रमाणावर मुक्तविहार करण्यासाठी हेदवी समुद्रकिनारी येत असतात. अशावेळी मुक्त विहार करत असताना हा डॉल्फीन खडकामधे अडकला. त्याचदरम्यान ओहोटी चालू झाल्याने पाण्याची पातळी कमी होऊन त्याला खडकातून बाहेर पडून पुन्हा समुद्रात जाणे शक्य झाले नाही. शेवटी त्याचा पुरेशा पाण्याअभावी मृत्यू झाला असल्याचा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
सकाळी नियमितपणे समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी जाणाऱया सुरेंद्र भाटकर यांच्या शेवटची घटका मोजत तडफडणारा हा डॉल्फीन नजरेस पडला. त्यांनी तातडीने गावातील तरुणांना बोलावून या डॉल्फीनला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नाही. शेवटी त्या खडकात अडकलेल्या डॉल्फीनने आपला अखेरचा श्वास घेतला. या बाबत हेदवी येथील पर्यटनप्रेमी युवक तारेश हळदणकर याने वनविभागाला माहिती दिली. वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने समुद्रकिनारीच या डॉल्फीनला दफन केले.