वृत्तसंस्था / मुंबई
सेमीकंडक्टर या महत्त्वाच्या भागाच्या टंचाईमुळे ठरल्याप्रमाणे वाहन उत्पादक कंपन्यांना आता झळ बसू लागली आहे. सदरच्या भागाच्या अनुपलब्धतेमुळे कार निर्मितीच्या प्रकियेत विलंब जाणवू लागला आहे. फोर्डसह इतर कंपन्यांना याची झळ बसली आहे.
फोर्डने आपला चेन्नईतला कारखाना याच कारणासाठी आठवडय़ासाठी बंद केला आहे तर दुसरीकडे सदरच्या कंपनीचा जर्मनीतील कारखानाही महिनाभर बंद राहणार असल्याचे समजते. वाहन निर्मात्या कंपन्यांना लागणाऱया सेमीकंडक्टरची टंचाई विविध देशांना जाणवू लागली आहे. त्यामुळे देशासह विदेशातील वाहन उत्पादन काहीसे प्रभावीत होणार आहे. अर्थातच कार्सच्या उत्पादनावर याचा परिणाम होणार असून नवी कार घेणाऱयांना आता कारसाठी अधिक कालावधीसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

फोर्डच्या जर्मनीतील कारखान्याला 19 फेब्रुवारीपर्यंत कुलूप असणार असून तेथे 5 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. युरोपातील लोकप्रिय कार्सच्या उत्पादनाचे कार्य या कारखान्यात चालते. लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र कार्सची विक्री घटली होती. पण दुसरीकडे गॅजेटस्ची मागणी मात्र चांगलीच वाढली होती. सेमीकंडक्टर बनवणाऱया मोठय़ा कंपन्यांनी स्मार्टफोन, लॅपटॉप, गेमिंग उपकरणे व इतर साधने बनवणाऱया कंपन्यांना सेमीकंडक्टरचा पुरवठा सुरू केला. पण वाहनांकरीताची सेमीकंडक्टरची मागणी ही जास्तीची असते. कारण एका कारमध्ये 50 ते 150 संख्येइतक्या चिप बसवल्या जातात. हे पाहता मागणीप्रमाणे पुरवठा करणे सेमीकंडक्टर बनवणाऱया कंपन्यांना जड जाते आहे. पण लवकरच याबाबतीत तोडगा काढला जात असल्याचे तज्ञांकडून सांगितले जात आहे.
इतर कंपन्याही प्रभावीत
सेमीकंडक्टरच्या टंचाईने ऑडीचे जर्मनी व मेक्सीकोतील उत्पादनही कमी करण्यात आले आहे. काही कालावधीकरीता कंपनीने आपल्या 10 हजार कर्मचाऱयांना सुट्टीही दिली आहे. फिएट ख्रिस्लरने मेक्सीको आणि टोयोटाने चीनमधील कारखाना सध्या बंद केला आहे.
कोणते देश अडचणीत
आयएचएस मार्केट या फर्मनुसार युरोप, भारत, जपान, उत्तर अमेरिका या देशांतील ऑटो कंपन्यांना सेमीकंडक्टरच्या तुटवडय़ाचा चांगला फटका बसणार असल्याचे कळते. या देशातील कार उत्पादनात आगामी काळात परिणाम होणार आहे. सर्वात मोठा फटका चीनला बसणार आहे.