अंकली येथील दुर्घटना
वार्ताहर/ मांजरी
अंकली येथील चिकोडी-मिरज राज्य महामार्गावर असलेल्या विजय बॅटरी व स्टार इलेक्ट्रॉनिक या दोन दुकानास शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. यात दोन्ही दुकाने जळून खाक झाली. चिकोडी, रायबाग व चिदानंद कोरे कारखाना येथून आलेल्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. या आगीत दोन दुकाने जळून खाक झाल्याने सुमारे 9 लाख रुपयांची हानी झाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, चिकोडी-मिरज रस्त्यावर असलेल्या विजय बॅटरी व त्याला लागून असलेल्या स्टार इलेक्ट्रॉनिक्स या दोन्ही दुकानांना अचानक आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. या दरम्यान याची माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. सुमारे दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांना यश मिळाले.
विजय बाबू बेळवी यांच्या मालकीचे विजय बॅटरी या दुकानात विविध प्रकारच्या बॅटरी व इतर साहित्य जळून खाक झाले. यामध्ये त्यांचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले. तर शेजारीच असलेले ज्योतीराम शंकर घाडगे यांचे एलईडी व एलसीडी दुरुस्त करण्याचे स्टार इलेक्ट्रॉनिक नावाचे दुकान जळाले. यामध्ये त्यांचे सुमारे चार लाखाचे नुकसान झाले.
आगीचे कारण मात्र समजू शकलेले नाही. शनिवारी सकाळी तलाठी एस. व्ही. गवी यांनी भेट देऊन पाहणी केली. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. नुकसानीबद्दल ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.