बीसीसीआयच्या बैठकीत निर्णय, ‘विंडो’ नसल्याने यावर्षी स्पर्धा होण्याची शक्यता कमी, खेळाडू-प्रँचायजींना बसणार आर्थिक फटका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयपीएलची तेरावी आवृत्ती पुढील सूचना येईपर्यंत बेमुदत लांबणीवर टाकण्याचा निर्णय बुधवारी बीसीसीआयने घेतला आहे. केंद सरकारने मंगळवारी लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यानंतर 3 मेपर्यंत स्पर्धा लांबणीवर टाकल्याचे आधी बीसीसीआयने सांगितले होते.
या वर्षीची आवृत्ती आधी नियोजित केल्याप्रमाणे 29 मार्चपासून सुरू होणार होती. पण कोरोना व्हायरस महासाथीमुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर 14 एप्रिलपर्यंत ती लांबणीवर टाकण्यात आली होती. पण पुन्हा लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केल्यानंतर आता बीसीसीआयला अनिश्चित काळासाठी ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. तसे त्यांनी आयपीएल प्रँचायजींनाही बुधवारी कळविले आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ही स्पर्धा बीसीसीआय आयोजित करेल किंवा नाही, हे त्यावेळच्या जागतिक स्थितीवर अवलंबून राहील.
‘बीसीसीआयने आयपीएल लांबणीवर टाकले असल्याची माहिती आम्हाला दिली आहे. पण त्यांना परिस्थितीत सुधारणा होऊन या स्पर्धेसाठी विंडो मिळेल, अशी आशाही वाटत आहे,’ असे एका प्रँचायजीच्या पदाधिकाऱयाने सांगितले. केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढविला असल्याने नेहमीच्या कालावधीत आयपीएल स्पर्धा आयोजित करता येणार नसल्याचे आयपीएल चीफ ऑपरेटिंग ऑफिसर हेमांग अमिन यांनी आठ प्रँचायजींना बुधवारी कळविले आहे.
कॉन्फरन्स कॉलद्वारे चर्चेनंतर निर्णय

बीसीसीआयच्या पदाधिकाऱयांच्या कॉन्फरन्स कॉलद्वारे झालेल्या चर्चेत हा निर्णय घेतला गेला आहे. या चर्चेत अध्यक्ष गांगुली, सचिव जय शहा, आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल, बीसीसीआय खजिनदार अरुण धुमल व सीओओ हेमांग अमिन यांनी भाग घेतला होता.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही, या वर्षाच्या पुढील टप्प्यात ही स्पर्धा आयोजित करण्याची शक्यता फेटाळून लावली होती.
‘एफटीपी निश्चित झालेले असल्याने त्यात काहीही बदल करता येत नाही. त्यामुळे नवीन कोणतीच रूपरेषा आखता येत नाही. सध्या जगभरात फक्त क्रिकेटच नव्हे तर सर्वच खेळ थांबलेले आहेत,’ असे त्यांनी म्हटले होते.
कोरोना व्हायरसच्या महासाथीने जगभरातील सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत आणि अनेक क्रीडा स्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत किंवा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. आता येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेवरही साशंकतेचे सावट आले आहे.
खेळाडू, फ्रँचायजींना बसणार आर्थिक फटका बीसीसीआयने एक महिन्याचा अवधी मिळाल्यास ही स्पर्धा आयोजित करण्याचा तसेच प्रेक्षकांशिवाय सामने खेळविण्याचा विचारही चालविला होता. पण लॉकडाऊनमुळे अनेक निर्बंध असल्यामुळे प्रवासी वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे विदेशी खेळाडूंना भारतात आणणे अशक्य होणार होते. त्यामुळे शेवटी बीसीसीआयला ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला. ही स्पर्धा जवळपास रद्दच झाल्यात जमा असल्याने खेळाडूंसह अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावात 62 खेळाडूंना आठ प्रँचायजींनी खरेदी केले होते. यासाठी सगळय़ांनी मिळून 140.30 कोटी रुपये खर्च केले होते. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स त्यात सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला केकेआरने 15.5 कोटी रुपयांना खरेदी केले होते. आता ही स्पर्धा न झाल्यास एकाही खेळाडूला मानधन मिळणार नाही. सर्व प्रँचायजी खेळाडूंना दोन हप्त्यात मानधन अदा करतात. स्पर्धा सुरू होण्याच्या एक आठवडा आधी एक हप्ता दिला जातो आणि उर्वरित रक्कम स्पर्धा संपल्यानंतर दिली जात असे. प्रँचायजींना जाहिरातीतून मिळणारा महसूल आता मिळणार नसल्याने त्यांनाही आर्थिक फटका बसणार आहे.