ड्रायव्हरच निघाला टोळीचा म्होरक्या
सांगली / प्रतिनिधी
शहरातील वखारभाग येथे 21 जानेवारी रोजी संभा भेळच्या दारात लावण्यात आलेल्या इनोव्हा कार मधून साडेसहा लाखाची बॅग चोरटयांनी पळवून नेली होती. या टोळीचा म्होरक्या हा या इनोव्हाचा ड्रायव्हरच निघाला. पोलीसांनी या प्रकरणी लक्ष्मण मारूती जावीर (ड्रायव्हर) वय 37 रा. इंदिरानगर मालगाव रोड मिरज, शक्ती बाबासाहेब मोरे वय 31 रा. हुळ्ळे प्लॉट सुभाषनगर मिरज, अमर दत्तात्रय संकपाळ वय 29 रा. शांता कॉलनी कुपवाड रोड कुपवाड. या तिघांना अटक केली आहे. सांगली शहर पोलीसांनी त्यांच्याकडून चोरीतील तीन लाख 10 हजार रूपये जप्त केले आहेत. तसेच एक मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.
याबाबत हकीकत अशी की, फिर्यादी वसीम मुश्ताक नायकवडी रा. शंभर फुटी रोड सांगली हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. शुक्रवारी 21 जानेवारी रोजी त्यांनी जयसिंगपुर येथील चक दे वडा या ढाब्यावर एका ग्राहकांने त्यांना साडे सहा लाख रूपये दिले. हे साडे सहा लाख रूपये इनोव्हा कारमधून घेवून ते सायंकाळी साडेसातच्या सुमारास वखारभागातील संभा भेळ याठिकाणी आले. साडे सहा लाखाची रक्कम असणारी बॅग त्यांनी गाडीतच ठेवली होती. पण नाष्टा करून आल्यावर ही बॅग आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ सांगली शहर पोलीस ठाण्यात याची फिर्याद दिली होती. पोलीसांनी तात्काळ घटना घडलेल्या ठिकाणी जावून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले तसेच त्यांचा पाठलाग कोणी करत होते का याचीही माहिती घेतली पण त्यामध्ये काहीही आढळून आले नाही.
त्यामुळे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर ढोरे यांना यामध्ये काहीतरी गोलमाल असल्याचा संशय आला त्यामुळे त्यांनी या गाडीचा ड्रायव्हर लक्ष्मण जावीर याला चौकशीसाठी बोलविले त्यावेळी तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे त्यांने सांगितले. पण पोलीसांच्या चौकशीत त्याला कोरोना झाला नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी त्याची वैयक्तिक माहिती काढली असता तो कर्जबाजारी असल्याचे लक्षात आले तसेच त्याचा मोबाईल नंबरही ट्रेस केला असता तो ठराविक व्यक्तीशी सातत्याने बोलत असल्याचे लक्षात आल्यावर पोलीसांनी त्याला चौकशीसाठी आणले असता पोलीसांना तो काहीही जुमानत नव्हता पण ज्यावेळी त्याला पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांने तात्काळ हा गुन्हा कबूल केला. तसेच यामध्ये आणखीन दोन साथीदार असल्याचेही सांगितले. त्यानंतर पोलीसांनी त्याच्या इतर दोन साथीदारांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे असणारी तीन लाख 10 हजाराची रक्कम जप्त केली तसेच हे तिघेजण वापरत असणारी 40 हजाराची दुचाकी जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर ढोरे, विनायक शिंदे, गुंडोपंत दोरकर, डॅनियल घाडगे, दीपक कांबळे, विक्रम खोत, संदीप पाटील, झाकीरहुसेन काझी यांनी पार पाडली.
फिर्यादी नायकवडी यांनी ही रक्कम गाडीतच ठेवल्यानंतर ड्रायव्हर जावीर यांने त्यांच्या साथीदारांना संभा भेळ जवळ बोलावून घेतले होते. नायकवडी हे नाष्टा करण्यासाठी उतरल्यावर ड्रायव्हर जावीर यांने साडेसहा लाखाची बॅग साथीदाराच्या ताब्यात दिली असल्याचे पोलीसांच्या तपासात पुढे आले. जावीर यांने कोणतीही शंका येवू नये म्हणून तो बॅग दिल्यावर तात्काळ नाष्टा करण्यासाठी गेला. त्यानंतर गाडीत आल्यावर ती बॅग दिसली नाही त्यावेळी फिर्यादी नायकवडी यांनी बॅग चोरीची तक्रार दिली.