ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत वस्त्रोद्योगाशी संबंधित पीएलआय योजनेला मंजूरी देण्यात आली आहे. या योजनेद्वारे जवळपास सात लाख रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
अनुराग ठाकूर म्हणाले, केंद्र सरकारने देशात उत्पादन वाढवण्यासाठी पीएलआय योजना सुरू केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत वस्त्रोद्योगाशी संबंधित पीएलआय योजनेला मंजूरी देण्यात आली आहे. ही योजना मानवनिर्मित फायबर विभाग आणि तांत्रिक कापडांसाठी आहे. मानवनिर्मित फायबर कपडय़ांसाठी 7,000 कोटी रुपये तर तांत्रिक कापडांसाठी 4,000 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. या योजनेमुळे जवळपास 7 लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. भारतीय कापड उद्योगात कापसाचे योगदान 80 टक्के तर मानवनिर्मित फायबरचे केवळ 20 टक्के योगदान आहे. त्यामुळे या उद्योगाला आज मंजूर करण्यात आलेल्या पीएलआय योजनेचा फायदा होईल, असेही ते म्हणाले.