प्रतिनिधी/ नवारस्ता
रविवारी रात्रीपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा धरला असून धरणात प्रतिसेकंद 4 हजार 518 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठय़ात पुन्हा वाढ सुरू झाली असून सोमवारी सकाळपर्यंत धरणातील पाणीसाठा 52.51 टीएमसी इतका झाला आहे. तर धरणाच्या पायथा वीजगृहातून वीज निर्मितीनंतर 1 हजार 139 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे. दरम्यान सोमवारपासून पाटण तालुक्यात सर्वत्र पावसाला सुरुवात सुरू झाली आहे. जिल्हय़ाच्या पश्चिमेकडील महाबळेश्वर, वाई, जावलीतही पाऊस वाढला आहे. सातारा शहरातही दिवसातून दोन वेळा पावसाच्या सरी आल्या.
गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने कोयना पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात रविवारी रात्रीपासून पुन्हा सुरूवात केली आहे. सोमवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातून धरणाच्या पाणी साठय़ात पुन्हा वाढ सुरू झाली आहे.
सध्या धरणात प्रतिसेकंद सरासरी 4 हजार 518 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्याचवेळी धरण पायथा वीजगृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सिंचनासाठी 1हजार 139 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. धरणाची सध्याची स्थिती पाहता येथे सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यत एकुण उपलब्ध पाणीसाठा 52.58 टीएमसी, पाणी उंची 2110.02 फूट, जलपातळी 643.153 मीटर इतकी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत कोयनानगर येथे 60 मिलीमीटर (1817), नवजा 61 (1996), महाबळेश्वर 38 (1916) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, कराड तालुक्यातही सोमवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. जुलै महिन्यात ओढ दिल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून पाऊस सक्रीय झाला आहे. आज दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या.